देऊळगाव राजा (हॅलो बुलडाणा/संतोष जाधव) – जेष्ठ नागरिकांनी कोणत्याही अमिषाला बळी पडू नये, आपली माहिती कोणालाही देऊ नये! – अशा स्पष्ट शब्दांत उपविभागीय पोलिस अधिकारी मनिषा कदम यांनी सायबर गुन्ह्यांबाबत सावधगिरीचा इशारा दिला आहे.शुक्रवारी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात जेष्ठ नागरिकांची विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेच्या अध्यक्षस्थानी मनिषा कदम होत्या. त्यांनी जेष्ठ नागरिकांसाठी सरकारने लागू केलेल्या नव्या कायद्यांची सविस्तर माहिती दिली. “सायबर गुन्हेगार दिवसेंदिवस नव्या क्लृप्त्या वापरत आहेत. अनोळखी व्हिडीओ कॉल, व्हॉईस कॉल, ओटीपीची मागणी करणारे फोन – या सर्वांपासून सावध राहा,” असा ठाम इशारा त्यांनी दिला.
यावेळी ठाणेदार आशिष रोही यांनी देखील मार्गदर्शन करत सायबर सुरक्षेचे महत्त्व अधोरेखित केले. “ज्येष्ठ नागरिक हे फसवणुकीचे सहज बळी ठरतात. त्यामुळे जागरूकता अत्यावश्यक आहे,” असे ते म्हणाले.बैठकीत सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी रमेश कायंदे, प्रा. विनायक कुलकर्णी, आंबेकर, भावसार, भंडारी यांनी शहरातील विविध समस्या मांडल्या. “तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेत तात्काळ उपाययोजना केली जाईल,” असे आश्वासन मनिषा कदम यांनी दिले.
सभेला सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मापारी मामा, सचिव गोविंदराव बोरकर, पंडीत पाथरकर, प्रा. अशोक डोईफोडे आदींची उपस्थिती होती. आभारप्रदर्शन प्रा. विनायक कुलकर्णी यांनी केले.