बुलढाणा (हॅलो बुलडाणा) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी बलिदान देणाऱ्या स्व.कैलास नागरे यांच्या कुटुंबीयांना मुलांच्या शिक्षणाचा खर्च अर्थात पालकत्व स्वीकारण्याचा शब्द दिला होता परंतु नव्या शैक्षणिक सत्राला सुरूवात होऊन सुद्धा अद्यापही नागरे कुटुंबाला कुठलीही मदत मिळाली नाही. त्यामुळे पिडीता श्रीमती स्वाती नागरे यांनी ‘मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांचे आणखी बलिदान हवे असल्यास ते सुद्धा मी देणार’ असे म्हणत, एसडीओ यांना निवेदन देऊन उपोषणाचा इशारा दिला आहे.
जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाळ येथील तरुण शेतकरी कैलास नागरे यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी आत्महत्या नव्हे तर बलिदान दिले.या घटनेने राज्यभर खळबळ उडाली होती. यावेळी भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचे हे उदाहरण असल्याचा आरोप करण्यात आला होता.कैलास नागरे यांचा सरकारी बळी असल्याचा विरोधकांनी आवाज उठविला होता.दरम्यान अनेक नेत्यांनी शेतकऱ्यांसाठी आदर्श असलेल्या कैलास नागरे यांना श्रद्धांजली वाहत त्यांच्या कुटुंबीयांना धीर दिला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा नागरे कुटुंबीयांना मुलांच्या शिक्षणाचा खर्च अर्थात पालकत्व स्वीकारण्याचे आश्वासन दिले होते.परंतु अद्यापही मुलांच्या शिक्षणासाठी किंवा पालकत्वाच्या संदर्भातील कुठलीही माहिती श्रीमती स्वाती नागरे यांच्या पर्यंत पोहोचली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान ‘मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांचे बलिदान देऊनही जर कळत नसेल तर, मी पण बलिदान देते..21 जुलै रोजी राहत्या घरी उपोषण देखील करणार आहे’ असे एसडिओ यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे.