बुलढाणा (हॅलो बुलडाणा) बुलढाणा शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतच असून, आज ९ जुलै रोजी दुपारी या हैदोसाने विक्राळ रूप घेतले. हिरोळे पेट्रोल पंप परिसरात पिसाळलेल्या एका कुत्र्याने थेट रस्त्यावरून चालणाऱ्या नागरिकावर हल्ला चढवला. या एका घटनेनंतर धक्कादायक माहिती समोर आली असून, त्याच कुत्र्याने आतापर्यंत तब्बल १० ते ११ जणांना चावा घेतल्याचे उघड झाले आहे.
शहरात अनेक ठिकाणी कुत्र्यांचे टोळके मुक्त संचार करत असून, सकाळी शाळेत जाणारे विद्यार्थी, कामावर जाणारे कर्मचारी आणि वृद्ध नागरिक जीव मुठीत धरून चालताना दिसत आहेत. पूर्वीही अशा हल्ल्यांमध्ये अनेकांना गंभीर दुखापती झाल्या असून, सत्ताधाऱ्यांच्या ढिसाळ प्रशासनामुळे नागरिकांचा संयम सुटू लागला आहे.आज झालेल्या घटनेनंतर जखमी व्यक्तीला तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुज्ञ नागरिकांनी धाडस दाखवत त्याला मदत केली, मात्र प्रशासन मात्र नेहमीप्रमाणे ‘झोपे’तच असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
या पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त तत्काळ न केल्यास आणखी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आता लोकांनी मनपावर रोष व्यक्त करत कुत्रे मोकाट प्रशासन गाफील! अशा संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्वरित उपाययोजना करावी अन्यथा आंदोलनाचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.