बुलडाणा (हॅलो बुलडाणा) कोलवड पुलाजवळील नदीपात्रात एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याने गावात खळबळ उडाली आहे. वय अंदाजे ६० ते ६५ वर्षांच्या पुरुषाचा मृतदेह आज सकाळी नागरिकांना नदीत तरंगताना दिसला. त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली.ही घटना नेमकी अपघात, आत्महत्या की घातपात – याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. मृत व्यक्तीच्या अंगावर कोणताही ओळखपत्र किंवा ठळक खुणा नसल्याने त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. नदीत मृतदेह दिसल्याने स्थानिक नागरिकांनी मृतदेह बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिला.
गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, नदीपात्रात मृतदेह कसा आला यावर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. दरम्यान, पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. मृताचे फोटो आजूबाजूच्या गावात पाठवून ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.