मुंबई/बुलढाणा (हॅलो बुलडाणा) “डाळ शिळी असली म्हणून गरिब कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करणार का?” असा संतप्त सवाल करत शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी आमदार संजय गायकवाड यांच्यावर तत्काळ कारवाईची मागणी केली आहे.
मंगळवारी रात्री आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये जेवण शिळं आल्याचा आरोप करत बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी थेट व्यवस्थापकाला धारेवर धरले. त्यानंतर टॉवेल आणि बनियन घालून राडा करत त्यांनी कर्मचाऱ्याला मारहाण केली. यामुळे संपूर्ण अधिवेशनात खळबळ उडाली आहे.संजय राऊत यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया देताना म्हटले की, “हेच धान्य आदिवासी व गोरगरिबांना दिलं जातं. मग तिथं का नाही राडा? भ्रष्टाचारावर चर्चा करायची तर सभागृहात करा, पण हात उगारणं हा गुन्हा आहे.”
ट्विटरवरून राऊत यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत गायकवाड यांच्यावर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. “सत्तेच्या मस्तीपायी कर्मचाऱ्यांवर हात उचलणं निंदनीय आहे, हे वागणं आमदाराला शोभत नाही,” अशी टीका त्यांनी केली.