मलकापूर (हॅलो बुलडाणा) मलकापूर ग्रामीण भाग १ परिसरातून चोरीला गेलेल्य महावितरणच्या उच्चदाब व लघुदाब अश्या एकुण ७.५ किमी वाहिन्याची,वीज खांब व आवश्यक साहित्याची कायदेशिर कारवाईची प्रक्रीया पुर्ण झाल्यानंतर महावितरणकडून तातडीने तजवीज करण्यात आली आहे. पुढील तीन ते चार दिवसात नविन खांबासहीत वीज वाहिन्या उभारण्याचे काम पुर्ण होणार असून त्यानंतरच या परिसरातील वीज पुरवठा सुरू होईल अशी माहिती कार्यकारी अभियंता रत्नदिप तायडे यांनी दिली आहे.
मलकापूर ग्रामीण भाग –१ परिसरात हिंगणा काझी क्रिष्णा मंदिर ते देवधाबा रोडवरील डांगे यांच्या शेतशिवारातील देवधाबा या ११ केव्ही उच्चदाब वाहिनीचे ३५ वीज खांबामधील ५.२ किमी लांबीची वीज वाहिनी अज्ञात चोरट्यांनी १० सिमेंटचे वीज खांब मोडून चोरून नेली. त्याचबरोबर कुलकर्णी डिपीवरून वीज पुरवठा होणाऱ्या लघुदाब वाहिनीवरील नऊ वीज खांबातील आठ वीज वाहिन्यांचे स्पॅन चोरून नेल्यामुळे ६ पोल मोडून पडले आहे. त्यामुळे यापरिसरातील शेतकऱ्यांचा वीज पुरवठा बंद होता.
दिनांक ३० मे च्या रात्री घडलेल्या या घटनांची सहाय्यक अभियंता गोपाल बावस्कार यांनी दिलेल्या तक्रारीनंतर मलकापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात विद्युत कायदा २००३ अंतर्गत कलम १३६ आणि १३९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.परंतू यामुळे महावितरणचे अंदाजे १ लाख ६२ हजाराचे आर्थीक नुकसान झाले आहे.शिवाय वीज ग्राहकांच्या रोषाचाही सामना महावितरणच्या कर्मचाऱ्यांना करावा लागत आहे.महावितरणची यंत्रणा वीज ग्राहकांच्या सेवेसाठी आहे.त्यामुळे वीज वाहिन्या चोरणे किंवा वीज यंत्रणेला क्षती पोहचविण्याच्या घटना आढळल्यास सेल्फ पोलिसिंग म्हणून महावितरणला माहिती देवून सहकार्य करावे जेणेकरून अश्या घटनेला आळा बसेल असे आवाहन कार्यकारी अभियंता रत्नदिप तायडे यांनी केले आहे.