चिखली (हॅलो बुलडाणा) शासनाच्या १४ ऑक्टोबर २०२४ च्या आदेशानुसार विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळा वर्ग आणि तुकड्यांना टप्पावाढ मिळावी या मागणीसाठी ५ जूनपासून शिक्षक समन्वय संघाचे आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन सुरू आहे. सरकार त्याची दखल घेत नसल्याने शिक्षक समन्वय संघाने ८ व ९ जुलै रोजी शाळा बंद आंदोलनाची हाक दिली होती. अनेक शिक्षक संघाने या आंदोलनास पाठिंबा दर्शविला असून 8 व 9 जुलै ला अंश अनुदानित शाळा बंद राहणार आहे.शिक्षकांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता टप्पावाढ देण्याची मागणी अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रा. तनज़ीम हुसैन, व शिक्षक समन्वय संघाचे जिल्हाअध्यक्ष पुरुषोत्तम किलबिले सर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली.
टप्पा अनुदान वाढीसाठी शेकडो आंदोलने झाली आहेत. परंतु सरकारने फक्त जबाबदारी ढकलण्याचे काम केले. यामुळे शिक्षक समन्वय संघाने दोन दिवसीय शाळाबंद आंदोलनाची हाक दिली आहे जर या आंदोलनात शिक्षकांना न्याय मिळाला नाही तरी शासनाने शिक्षकांच्या मागण्यांना न्याय देऊन त्यांना हक्काचा पगार देण्यात यावा अन्यथा ही आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
▪️राज्यातील हजारों शिक्षक २० वर्षा पासून उपाशी!
एकीकडे शिक्षकांना देशाचा शिल्पकार म्हणायचे, त्यांच्या नावाने शिक्षक दिन साजरा करायचा. आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करायचा आणि दुसरीकडे त्याला उपाशी मारायचे हे धोरण आहे. यामुळे राज्यातील कायम शब्द काढलेल्या सुमारे चार हजार विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळा वर्ग आणि तुकड्यांवर हजारो शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी गेली २५ वर्षे उपाशीपोटी काम करीत आहेत. केलेले कायदे पाळायला सरकार तयार नाही, याचे शल्य वाटते, असे प्रा. पुरुषोत्तम किलबिले म्हणाले.
▪️८ व ९ जुलै रोजी होणार शाळाबंद आंदोलन!
अनेक शिक्षक संघाने या आंदोलनास पाठिंबा दिला आहे. टप्पावाढ न दिल्यास बेमुदत शाळाबंद आंदोलनाचा इशारा अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटना व शिक्षक समन्वय संघटना आणि शिक्षक महासंघ,अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना,राज्य शिक्षक संघ,विदर्भ माध्यमिक शिक्षण संघ, इत्यादी शिक्षक संघाचे पाठिंबा दर्शविला आहे.