चिखली (हॅलो बुलडाणा/ सय्यद साहिल) चिखलीत भरदिवसा प्रवाशाला धमकावून खिशातील मोबाईल आणि रोख रक्कम हिसकावणाऱ्या दोन अज्ञात चोरट्यांचा तीन तासांत शोध लावून पोलिसांच्या डी.बी. पथकाने चांगलीच चुणूक दाखवली.
दि. ४ जुलै रोजी राऊतवाडी येथील AU स्मॉल फायनान्स बँकेतून पत घेतलेले पैसे आणि दोन मोबाईल घेऊन फिर्यादी बसस्टँडकडे जात असताना शिवाजी शाळेजवळ अॅटोमधून आलेल्या दोघांनी त्याला गाठून गळा दाबत जीवे मारण्याची धमकी दिली आणि खिशातील ₹३००० रोख व ₹१८,५०० किमतीचे दोन मोबाईल हिसकावले. या धक्क्याने फिर्यादीची पत्नी तब्येत बिघडल्यामुळे तक्रार दुसऱ्या दिवशी दाखल करण्यात आली.गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन पो.नि. संग्राम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाने तपासाची चक्रे फिरवत अवघ्या काही तासांत बुलडाण्यातून आरोपी शेख नुमान व फैजान खान यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेला ₹८०,००० किंमतीचा अॅटो, दोन्ही मोबाईल आणि ₹१७६० रोख रक्कम असा एकूण ₹१,००,२६० चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उपनि. समाधान वडणे आणि डी.बी. पथकाने केली. आरोपींना अटक करून न्यायालयाने थेट जेलवाट दाखवली आहे.