बुलढाणा (हॅलो बुलडाणा) अतिवृष्टीमुळे लोणार आणि मेहकर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत देण्यासंदर्भात आज मुंबई येथे केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधव आणि महसुल मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्यात बैठक झाली. या बैठकीत महसुल मंत्र्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसंदर्भात सकारात्मकता दर्शविली आहे.
26 जुन रोजी बुलढाणा जिल्हयातील लोणार आणि मेहकर तालुक्यात ढगफूटी सदृष्य पाऊस पडला. या दोन्ही तालुक्यात शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी पावसाच्या पाण्यासोबत खरडुन गेल्या. शेतजमिनीत वाळुचे व दगडाचे ढिग साचल्या गेले. 27 जुन ला केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधव यांना या संदर्भाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी 28 व 29 जुन ला शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अतिवृष्टीने बाधीत झालेल्या क्षेत्राचा दौरा केला होता. त्यानंतर 30 जुन ला केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधव हे मुंबई दौऱ्यावर असतांना त्यांची मंत्रालयात राज्याचे महसुल मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीमध्ये केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधव यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती महसुल मंत्र्यांना दिली. सोबतच अतिवृष्टीने बाधीत क्षेत्राचे छायाचित्र महसुल मंत्र्यांना दाखवुन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची दाहकता त्यांच्या निदर्शनास आणुन दिली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने भरघोस मदत देण्यासंदर्भात यावेळी चर्चा झाली. केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधव हे बाधीत क्षेत्राच्या दौऱ्यावर असतांनाच झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासन अहवाल तयार करत आहेत. आज केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधव यांनी राज्याचे महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बैठकीनंतर मंत्रालय स्तरावरुनही तात्काळ अहवाल शासनाला सादर करण्याचे सुचित करण्यात आले आहे.