बुलढाणा (हॅलो बुलडाणा) राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर आले असताना,तत्पूर्वी मंत्र्यांच्या स्वागतासाठी विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाने साफसफाई सारख्या कामात राबविल्याण्याने संताप व्यक्त होत आहे.शालेय प्रवेशाचा पहिला दिवस असून विद्यार्थ्यांना राबवून घ्यायचे आणि पुन्हा त्यांचेच बिस्किट पुडा देऊन स्वागत करायचे, हे अयोग्य असून महायुती सरकारने आणि शिक्षण विभागाने ही नौटंकी बंद करावी,अशा सडतोड शब्दात शिवसेना उबाठाच्या राज्य प्रवक्त्या ॲड. जयश्रीताई शेळके यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील सिनगाव जहांगीर गावातील प्राथमिक शाळेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये शाळा सुरू होण्याआधी काही विद्यार्थ्यांना कचरा उचलण्याचे आणि शाळा झाडण्याचे काम लावल्याचं दिसून येत आहे. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याऐवजी त्यांना वेगवेगळी कामे लावल्यामुळे पालक आणि स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. तसेच शिक्षण विभागाकडून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.
उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्यानंतर आज विदर्भातील शाळांचे शैक्षणिक सत्र सुरू झाले आहे. शैक्षणिक वर्ष सुरु होत असल्यामुळे राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे हे बुलढाणा जिल्ह्यातील सिनगाव जहांगीर येथील प्राथमिक शाळेवर विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी येत होते ते आले पण. मात्र, दादा भुसे शाळेच्या ठिकाणी पोहोचण्याच्या आधीच शिक्षकांनी शाळेतील विद्यार्थ्यांना शाळा झाडणे, कचरा उचलणे आणि पाण्याच्या बाटलीचा बॉक्स उचलायला लावले आहेत. एकीकडे विद्यार्थ्यांचं स्वागत करण्याची भाषा तर दुसरीकडे विद्यार्थ्यांकडूनच शालेय काम करून घेण्याचा सपाटा दादा भुसे यांच्या कार्यक्रमात दिसून आला आहे.
▪️शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांकडून स्वच्छता!
आजपासून नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे. सर्वच ठिकाणी विद्यार्थ्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे. तर काही ठिकाणी विद्यार्थ्यांना वह्या आणि पेन देऊन स्वागत करण्यात येत आहे. दरम्यान, अशातच बुलढाणा जिल्ह्यातील सिनगाव येथील प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी मुलांना पहिल्याचं दिवशी स्वच्छता आणि पाण्याच्या बाटल्या उचलायला लावल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामुळे अनेकांनी शिक्षक आणि शाळेचा शिपाई यांच्यावर सवाल उपस्थित केला आहे.