डोणगाव (हॅलो बुलडाणा) गर्भलिंग निदान आणि बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करत PCPNDT पथकाने गुरुवारी रात्री मेहकर तालुक्यात एक मोठी कारवाई केली. हिंगोली जिल्ह्यातील गजानन विठ्ठल वैद्य (३८, रा. माझोड, ता. सेनगाव) याला शेलगाव देशमुख शिवारात अटक केली. आरोपी महिलेला कारमध्ये घेऊन वाशीम जिल्ह्यातून मेहकर तालुक्यात येत होता, परंतु पथकाच्या पाठलागामुळे त्याला गजाआड करण्यात आले.गजानन वैद्य याने महिलेला डॉक्टर म्हणून ओळख दाखवली होती आणि गर्भपात करण्यासाठी २८ हजार रुपये घेतले होते. त्याने महिला फसवून, “दुसरे डॉक्टर गर्भलिंग निदान करतील, मी गर्भपात करतो,” असे सांगितले होते. PCPNDT पथकाने डमी महिला तयार करून सापळा रचला आणि आरोपीला पकडले.
पोलिसांनी कारची झडती घेतल्यावर सेफ्टी ग्लोव्हज, ब्लड कलेक्शन बॉटल्स, सीरिंजसह वैद्यकीय साहित्य सापडले. डोणगाव पोलिसांनी डॉ. सुनीता हिवसे यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवला आहे. या रॅकेटच्या पाशांत मेहकरमधील काही डॉक्टरांचा सहभाग असण्याची शक्यता आहे आणि या प्रकरणाचा तपास सुरू आहे.