बुलढाणा (हॅलो बुलडाणा) जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून चक्रीवादळ अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणाने मोठा फटका दिला आहे. यामुळे रब्बी पीक, भाजीपाला, फळबागा तसेच शेडनेटचे मोठे नुकसान झाले आहे. या संकटात शेतकऱ्यांना धीर देण्याची गरज आहे, ही बाब हेरून शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या धर्मपत्नी ॲड. शर्वरी तुपकर यांनी आज 4 एप्रिल रोजी भल्या पहाटेपासून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करण्यासह शेतकऱ्यांना धीर दिला. यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्र क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी मधुकर शिंगणे, सहदेव लाड ,राम अंभोरे देखील उपस्थित होते.
रब्बी हंगामात शेतकऱ्यांच्या हाती अत्यल्प उत्पादना आले आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या मालाला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झालेले आहेत, या बिकट परिस्थितीत निसर्गाने आणखीच भर घालून शेतकऱ्यांना पुन्हा संकटात लॊटले आहे. त्यातच गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस, वादळीवारा, चक्रीवादळ यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे, भाजीपाला आणि फळबागांचे प्रचंड असे नुकसान झाले आहे. तर काही भागातील शेडनेटचे आणि शेतकऱ्यांनी जनावरे बांधण्यासाठी व शेतमाल ठेवण्यासाठी शेतात बांधलेल्या शेडचे देखील मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर सध्या जिल्ह्यात नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी त्यांच्या धर्मपत्नी ॲड. शर्वरी तुपकर शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आहेत. 4 एप्रिल रोजी भल्या पहाटे घराबाहेर पडून लोणार तालुक्यातील विविध गावांमध्ये जाऊन त्यांनी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. लोणार तालुक्यातील शिवणी पिसा, महारचिकणा, खापरखेड घुले यासह नुकसान ग्रस्त भागात जाऊन नुकसान झालेल्या शेतीपिकांची, शेडनेटची ॲड. शर्वरी तुपकर व ‘क्रांतिकारी’ च्या पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली. संकट मोठे असले तरी शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये असा धीर देत त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. तसेच चक्रीवादळामुळे जमीनदोस्त झालेल्या शाळेची पाहणी देखील त्यांनी पाहणी केली. अवकाळी पाऊस चक्रीवादळ व ढगाळ वातावरणामुळे झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी देखील ॲड. शर्वरी तुपकर यांनी केली आहे. यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मधुकर शिंगणे, सहदेव लाड ,राम अंभोरे ,संदीप सरकटे, सतीश वाघ ,विशाल पिसे ,संजाब पिसे,रमेश वाघ,ज्ञानेश्वर म्हस्के,संतोष ढाकणे,उद्धव नागरे, अशोक मुंढे ,लक्ष्मण वाघ, गजानन पिसे ,आनंथा पिसे, रवि पिसे ,राजेंद्र पिसे यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.