spot_img
spot_img

💥बापरे.. इतके गुन्हे! गुन्हेगारी वाढली; तपास थंडावला! – केवळ 4 महिन्यात 2 हजार 33 गुन्ह्यांची नोंद!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) वाढत्या शहरीकरणा बरोबरच जिल्ह्यात लहान मोठ्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे.खुन, चेन स्नॅचिंग, घरफोडी, दूचाकी चोरी यासारख्या नागरिकांना त्रासदायक ठरणाऱ्या गुन्ह्यांमध्ये मात्र लक्षणीय वाढ होत आहे.या तुलनेत या गुन्ह्यांच्या शोधाचे प्रमाण नगण्यच आहे.गत चार महिन्यात 2 हजार 33 गुन्हे नोंद झाले. यातील 1614 गुन्ह्यांची उकल झाली आहे.गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ होणे हे पोलिसांना निश्चितच शोभणारे नाही.

वाढत्या शहरीकरणाची काही वाईट अपत्येही आहेत. त्यातीलच एक म्हणजे गुन्हेगारी. रोजगाराची संधी हिरावली गेली किंवा उत्पन्न मिळेनासे झाले की गुन्हेगारीकडे व्यक्ती जातात, हे आजवर अनेकदा सिद्ध झाले आहे. शिवाय पैसा, प्रतिष्ठा यासारख्या बाबी मिळविण्याचा शॉर्टकट सुद्धा गुन्हेगारीत आहे, असा समज असल्यानेही गुन्हे वाढतात. छोट्या गुन्ह्यांमधून आलेला शहाणपणाच मोठ्या गुन्ह्यांचे धाडस करायला लावतो. उन्हाळ्याच्या सुट्या लागण्यापूर्वीच जिल्ह्यासह शहरात चोरी, चेन स्नॅचिंग, घरफोडी यासारख्या गुन्ह्यांनी डोके वर काढल्याचे चित्र आहे. गुन्ह्यांच्या या तुलनेत त्याचा शोध घेण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.जिल्ह्यात झालेल्या 2033 गुन्ह्यांपैकी सर्वाधिक 599 गुन्हे हिंसाचार म्हणजे हाणामारीचे आहेत.यापैकी 593 प्रकरणांचा तपास पूर्ण झाला आहे. तब्बल 332 चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

चोरीमुळे केवळ चार महिन्यात 2.70 कोटीचे नुकसान झाले.चोरी गेलेल्या मालमत्ते पैकी केवळ 63 लाखांची वसुली झाली आहे. जिल्ह्यात दरोड्याचे 6 गुन्हे घडले आहे. यात 1.41 लाखाची मालमत्ता जप्त करण्यात आली. शिवाय लाच लुचपतची 2 प्रकरणी घडली. बलात्काराच्या 52 घटना समोर आल्या पोलिसांनी तातडीने आरोपींना जेरबंद केले. खूनाच्या 25 घटना घडल्या असून, यातही आरोपी निष्पन्न झाले आहेत.
फसवणूक, विनयभंग, सरकारी कर्मचाऱ्यावरील हल्ला ही प्रकरणीही गंभीर आहेत.अंमली पदार्थ व जुगारावरही पोलिसांनी कारवाई केली आहे. घरफोडी हा एक गुन्हा गेल्या काही वर्षात लक्षणीयरित्या वाढला आहे. बंद घरे ही चोरट्यांसाठी मोठी पर्वणीच ठरते आहे. किरकोळ वस्तूंच्या चोरीपासून, तर मोठा ऐवज लंपास करण्यापर्यंत घरफोडीचे शस्र गुन्हेगारांकडून वापरले जात आहे.चेन स्नॅचिंगसारख्या गुन्ह्यात सराईत झालेले गुन्हेगार घरफोडीकडे वळतात, असे पोलिसांचेच निरीक्षण आहे. घरांवर पाळत ठेवून रात्रीच्या सुमारास घरफोडी करण्याचे प्रकार बळावत आहेत. चोरी ते घरफोडी यासारखे गुन्हे एखाद्या कुटुंबाला मोठा हादरा देणाऱ्याही ठरतात. कारण, अनेकांची मोठी मालमत्ता गमावल्याने त्यांच्या भविष्यावर मोठा परिणाम होतो. असे असतानाही या घटना घडू नये यासाठीच पोलिसांनी कारभार हाकणे गरजेचे आहे. मात्र, सद्यस्थितीत या गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ होणे हे पोलिसांनाही शोभणारे नाही. तर, गुन्हे घडूनही त्यांची उकल न होण्याने सर्वसामान्यांमध्ये भीतीचेच वातावरण तयार होत आहे. पोलिसांप्रती आदर निर्माण व्हावा, असे चित्र अपेक्षित आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!