घाटबोरी (हॅलो बुलढाणा/संतोष अवसरमोल)‘शिक्षण हे वाघणीचे दूध आहे, जो कोणी प्राशन करील तोगुरगुरल्याशिवाय राहणार नाही’ असे म्हटले जाते. शिक्षण ही पवित्र संस्था आहे. त्या शिक्षणाची ताकद ओळखून आज पालकवर्ग आपल्या चिमुकल्या बालकांना अंगणवाडीच्या अंगणापासून सुरवात करतात. मात्र,
मेहकर तालुक्यातील घाटबोरी गट ग्रामपंचायत गावातील चिमुकल्यांना हक्काचे अंगणच नसल्याने बिचाऱ्या चिमुकल्या बालकांची अंगणवाडी इमारतीसाठी वणवणच आहे. घाटबोरी गावात अद्यापही अंगणवाडी इमारती नसल्याने चिमुकल्यांना उघड्यावरच थंडी, वाऱ्यात ज्ञानार्जनाचे धडे गिरवावे लागत आहेत. चिमुकल्यांसाठी कुठलीच हक्काची अंगणवाडी इमारती नसल्याने चिमुकल्यांची पावले सैरवेर भटकंती होत आहे. त्यामुळे मिळेल तेथे अंगणवाडी उघड्यावर, ओट्यावर, पारावर, गोठ्यात आणि पडक्या-गळक्या, छताखाली अंगणवाडीची शाळा भरविण्यात येत असल्याने, चिमुकल्या बालकांना जीव धोक्यात घालून शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहेत. त्यामुळे चिमुकल्या पावलांची भटकंती थांबणार कधी असा प्रश्न गावकरी विचारत आहेत. त्यामुळे घाटबोरी गट ग्रामपंचायतीचे चित्र खूपच दयनीय आहे. विज्ञानाच्या युगात देश तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रगती करत आहे. अगदी अवकाशात भरारी घेत आहे. डिजिटल इंडिया, स्टार्टअप इंडिया, स्मार्ट सिटी, स्मार्ट विलेजच्या नावाने पुढे जात असताना आदिवासी भागात मात्र, समस्या जैसे थे असल्याचे दिसून येत असल्याने चिमुकल्या मुलांचे भवितव्य धोक्यात असतांना गावपुढारी, सरपंच, प्रशासन मात्र, अंगणवाडी समस्यांबाबत अनभिज्ञच आहे.
शासनस्तरावर कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध असताना सुद्धा ग्रामपंचायत अंगणवाडी इमारत बांधकामासाठी ठराव घेऊन शासन-प्रशासनाकडे पाठपुरावा करीत नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे खरोखरच ही ग्रामपंचायतेची उदासीनता म्हणावीत का? असा प्रश्न आता गावकरी विचारत असल्याने ग्रामस्थांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. अधूनमधून पावसाच्या सरी कोसळतात, पावसामध्ये लहान लहान मुले भिजून आजारी पडल्यानंतर याला जबाबदार कोण असा सवाल पालकांचा आहे. उन आणि पावसापासून संरक्षण मिळण्यासाठी चिमुकल्या विद्यार्थ्यांना हक्काचे छत असावे, तोडक्या-मोडक्या का होईना मात्र चार भिंती असाव्यात.ही पाल्यांसह चिमुकल्यांची ईच्छा आहे.
▪️ लोकप्रतिनिधींची उदासीनता
मागील पंचवार्षिकमध्ये अंगणवाडीच्या शाळा समाजमंदिरामध्ये भरविण्यात येत होत्या पण त्यांचं समाजमंदिरावर आता गावपुढाऱ्यांनी अतिक्रमण केल्याने समाजमंदिर खताचे, सिमेंटचे, गोडावून झाले आहे. तर कोणी वैयक्तिक वापरासाठी समाजमंदिर ताब्यात घेतलेले आहेत. त्यामुळे आता अक्षरशः चिमुकल्यांची शाळा उघड्यावर भरविण्यात आहे. असे विदारक चित्र असताना सुद्धा मताच्या चांगुलपणासाठी लोकप्रतिनिधिची उदासीनता दिसून येत आहे.