बुलढाणा (हॅलो बुलडाणा) महसूल विभागातील महाभ्रष्ट मंडळ अधिकारी विजय दत्तात्रय टेकाळे यांची अखेर बदली झाली असून, त्यांची उचलबांगडी बुलढाणा तालुक्यातून मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम येथे करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी हा धाडसी निर्णय घेत भ्रष्टाचार्यांना थेट दणका दिला आहे. ‘हॅलो बुलडाणा’, ‘दैनिक जनसंचलन’ व ‘सिटी न्यूज’च्या सातत्यपूर्ण वृत्तमालिका आणि पाठपुराव्याचे हे मोठे यश आहे.
वर्षानुवर्षे एका जागेवर चिकटून बसलेले टेकाळे हे बदल्यांचे नियम धाब्यावर बसवत होते. राजकीय हात आणि संघटनांचा वापर करून, शेकडो फेरफार घोटाळे, तुकडेबंदीतील गैरव्यवहार, न्यायालयीन आदेशांचे उल्लंघन, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशांना केराची टोपली दाखवणे – या सर्वांचे त्यांनी उघड उघड उघडकीस आलेले पाप आहे. बेनामी संपत्तीचा डोंगर उभारणाऱ्या टेकाळे यांच्याविरोधात १५० हून अधिक सातबारा उतारे साक्ष देतात. त्यांच्या, पत्नीच्या, भावाच्या नावावर ही संपत्ती असल्याचे दस्तऐवज उपलब्ध आहेत.’हॅलो बुलडाणा’ने त्यांच्या भ्रष्ट कारभारावर सातत्याने बातम्या प्रकाशित करत मंत्रालयापर्यंत पाठपुरावा केला. दोन जिल्हाधिकारी बदलले, पण कारवाई झाली नव्हती. अखेर जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी अधिकारीपदाचा खरा बाणेदारपणा दाखवत हा निर्णायक निर्णय घेतला.
टेकाळेंवर केवळ बदली नव्हे, तर सखोल चौकशी करून त्यांची बेनामी संपत्ती जप्त करावी, फौजदारी कारवाई करावी, अशी जनतेतून जोरदार मागणी होत आहे. या कारवाईमुळे ‘आपल्याला कोणी हात लावू शकत नाही’ अशा भ्रमात असलेल्या टेकाळेंसह इतर भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. हा निर्णय म्हणजे भ्रष्टाचाऱ्यांच्या मुसक्या आवळण्याच्या लढ्यातले पहिले पण ठोस पाऊल ठरले आहे.