सिंदखेडराजा (हॅलो बुलडाणा/सुरेश हुसे) पिंपळनेर शिवारात नंदहरी भालेराव यांच्या शेताजवळील कालव्याच्या (कॅनल) पाईपमध्ये अडकलेल्या एक जंगली प्राण्याची, म्हणजेच उदमांजराची (Asian Palm Civet) सुटका स्थानिक प्राणीमित्रांच्या सतर्कतेमुळे यशस्वीरित्या करण्यात आली. चार ते पाच दिवसांपासून या पाईपमध्ये अडकून पडलेल्या या प्राण्याचा जीव धोक्यात आला होता, मात्र प्राणीमित्रांच्या अथक प्रयत्नांमुळे त्यास पुन्हा एकदा जीवनदान मिळाले आहे.उदमांजर अडकला असल्याची माहिती मिळाल्यानंतर प्राणीमित्र वैभव लाखोले, सचिन वाघ सर, अभय कड आणि क्षितिज भालेराव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी नियोजनबद्ध आणि संयमित प्रयत्न करत हा प्राणी सुखरूपपणे बाहेर काढला. अडकलेल्या अवस्थेमुळे प्राण्याची प्रकृती बिघडलेली होती, त्यामुळे प्रथम त्याच्यावर प्राथमिक वैद्यकीय उपचार करण्यात आले. त्यानंतर त्याला अन्न दिले गेले आणि विश्रांती दिल्यानंतर त्याची प्रकृती सुधारल्यावर त्याला सुरक्षितपणे जंगलात सोडण्यात आले.
उदमांजर हा निसर्गाच्या अन्नसाखळीतील एक महत्त्वाचा घटक असून साप, उंदीर, छोटे पक्षी आणि मासे यांसारख्या प्राण्यांवर त्याचे उपजीविकेचे अवलंबित्व आहे. त्यामुळे तो पर्यावरणातील जैवसाखळी संतुलित ठेवण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. सध्या त्याची संख्या घटत असल्याने वन्यजीव संरक्षण कायदा, 1972 अंतर्गत त्याला संरक्षण दिले गेले आहे.