देऊळघाट (हॅलो बुलडाणा) गुंडगिरी मध्ये बुलढाणा जिल्ह्याची ही वाटचाल आता बीडच्या दिशेने होत असल्याचे चित्र मागील काही घटनेवरून लक्षात येत आहे. देऊळघाट येथील एका दारू तस्कराची इतकी हिंमत वाढली की, त्याने बियरची बॉटल फोडून गावात दारूबंदीची मागणी करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत भविष्यात जीवे मारण्याची धमकी दिली,तसेच या घटनेचे वृत्तांकन करणाऱ्या पत्रकाराच्या अंगावर सुद्धा तो धावून गेल्याचा प्रकार घडला आहे.या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झालेला आहे.
बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट येथे एकही अधिकृत दारूची दुकान नसतांना सर्रासपणे अवैधरित्या देशी आणि विदेशी दारू विक्री सुरू आहे.गावात प्रवेश करणाऱ्या मुख्य मार्गावरील मंदिरा जवळच दारू विक्री होत असतांना प्रशासनाचे या कडे दुर्लक्ष आहे. या अवैध दारू विक्रीच्या विरोधात ठोस कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप असून संबंधित विभागांना अनेक वेळा निवेदन देऊनही गावात दारूचा महापूर वाहत आहे. निवेदने देऊन देखील प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने देऊळघाट येथील सामाजिक कार्यकर्ते रिजवान खान उस्मान खान उर्फ राजू यांनी 26 मे पासून जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे लक्ष वेधण्यासाठी 2 दिवस आमरण उपोषण केले होते.गावात अवैध दारू विक्रीवर आळा घालण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर रिजवान खान उर्फ राजू यांनी आपले उपोषण सोडले. परंतु गावात दारूची अवैध विक्री होत असल्याने 31 मे रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास राजू खान यांनी अवैध दारूची तस्करी करणारी दुचाकी अडवली असता दारू तस्कर गजानन पन्हाळे रा. देऊळघाट हा तिथे पोहोचला व त्याने बिअरची बॉटल फोडून सामाजिक कार्यकर्ते राजू खान यांच्यावर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न केला व जीवे मारण्याची धमकी दिली.या घटनेची शूटिंग घेत असलेल्या एका पत्रकाराच्या अंगावर देखील दारू तस्कर गजानन पन्हाळे हा धावून गेला होता. या प्रकरणाची तक्रार देण्यासाठी राजू खान हे बुलडाणा ग्रामीण ठाण्यात पोहोचले मात्र पोलिसांकडून राजू खान यांना योग्य तो प्रतिसाद मिळत नसल्याची चर्चा सुरू आहे.या प्रकरणी दारू तस्करावर गुन्हा दाखल होते की नाही हे पाहाणे महत्वाचे आहे.