बुलढाणा (हॅलो बुलडाणा) हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर व स्थानक अभियान अंतर्गत मूल्यमापन समितीने येथील बस स्थानकावर परिसर स्वच्छता व सुंदरीकरण, चालक-वाहक विश्रांती गृह, प्रवाश्यांसाठी असलेले सुलभ शौचालय, स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष, प्रवाश्यांना दिल्या जाणाऱ्या सुखसोयी आदी विषयांची पाहणी करून मूल्यमापन केले.जिल्ह्यातील 5 बस स्थानकांची पुणे येथील 4 जणांच्या टीमने पाहणी केली आहे.
स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पुढील वर्षभर एसटीच्या राज्यभरातील सर्व बसस्थानकांवर हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान राबवण्यात येत आहे. यासाठी 3 कोटी रुपयांची बक्षिसे या अभियानांतर्गत देण्यात येणार असून राज्यात ‘अ’ वर्ग दर्जाप्राप्त पहिल्या येणाऱ्या बसस्थानकाला 1 कोटीचे बक्षीस जाहीर केले आहे. यानिमित्ताने बसस्थानकावर शालेय विद्यार्थी, सामाजिक संस्था व एसटी कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून सखोल स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. सर्वसामान्य प्रवाशांना स्वच्छ व सुंदर बसस्थानक तसेच निर्जंतुक, टापटीप प्रसाधनगृहे कायमस्वरूपी उपलब्ध करून देणे हे एस. टी. महामंडळाचे प्रथम कर्तव्य आहे. या जाणिवेतून हे अभियान सुरू करण्यात आले आहे.दरम्यान बुलढाणा बस स्थानकावर पुणे येथील प्रादेशिक व्यवस्थापक अमृता ताम्हणकर,वरिष्ठ सांख्यिकी अधिकारी गावडे,समिती सदस्य तथा पत्रकार संजय जाधव व प्रवासी मित्र विजय खंडागळे या पथकाने बुलढाणा बस स्थानकाचे मूल्यमापन केले. शुभांगी शिरसाट, विभाग नियंत्रक बुलढाणा विभाग, जाधव वाहतूक अधिकारी राप बुलढाणा, अजय नाईक विभागीय अभियंता राप बुलढाणा, गडलिंग आगार व्यवस्थापक राप बुलढाणा, कृष्णा पवार बस स्थानक प्रमुख राप बुलढाणा यांची उपस्थिती होती.
या पाहणी मध्ये बस स्थानकातील चालक वाहक यांचे विश्रांती गृह, प्रवाशी महिला – पुरुष यांच्या वापरातील शौचालय, गार्डन व्यवस्था आहे की नाही, बस स्थानकाची रंग रंगोटी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था , प्रवश्यांच्या सुरक्षेसाठी सिसिटीव्ही, बसेस स्वच्छता, पार्किंग व्यवस्था अश्या अनेक बाबतीत स्वच्छता पाहणी केली. स्वच्छते विषयी केलेली पाहणी नंतर दिलेले गुण व माहितीचा अहवाल मध्यवर्ती एसटी महामंडळ कार्यालय मुंबईला सादर करण्यात येईल दरम्यान एका वर्षात तीन वेळा बस स्थानकांची स्वच्छता पाहणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.