spot_img
spot_img

“दोन एसपी खुर्ची एक!” विशेष पोलीस महानिरीक्षक आले तरी अद्याप गुंता सुटला नाही! – सध्या तरी निलेश तांबेच एसपी! – 9 जूनच्या कॅटच्या सुनावणीनंतर होणार फैसला!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) गेल्या काही दिवसापासून जिल्हा पोलीस अधीक्षक पदावरून महानाट्य सुरू आहे.आज एसपी पदाच्या खुर्चीसाठी दोन वरिष्ठ अधिकारी समोरासमोर आले होते. विश्व पानसरे या एसपींनी शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता खुर्चीचा ताबा मिळवला तर गुरुवारी रात्री उशिरापर्यंत कामकाज केलेल्या नवनियुक्त निलेश तांबे या एसपींना अप्पर पोलीस अधीक्षकांच्या दालनात बसावे लागले. एकाच वेळी दोन्ही एसपींनी कार्यालयीन कामकाज सुरू केल्याने पोलीस दलातील सहकाऱ्यांना कोणत्या एसपींचा आदेश ऐकावा? असा प्रश्न पडला होता.दरम्यान विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांनी येथे येऊन दोघांशी चर्चा केली.अखेर तांबे हेच सध्या तरी बुलढाण्याचे एसपी असून, 9 जून रोजी कॅटची बदलीच्या स्थगिती वरील सुनावणी होईपर्यंत निश्चित एसपी कोण राहील हे स्पष्ट होणार आहे.

22 मे रोजी विश्व पानसरे यांची अमरावती येथे एसआरपी चे निदेशक म्हणून बदली करण्यात आली होती. त्यांच्या जागेवर नागपूर सीआयडी पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यावेळी पानसरे हे आजारी रजेवर गेलेले होते. अवघ्या आठ महिन्याच्या कालावधीत साईड पोस्टवर बदली झाल्याने मन दुखावल्याची भावना होऊन एसपी विश्व पानसरे यांनी 23 मे रोजी कॅटमध्ये धाव घेतलीआणि आपल्या बदलीला स्थगिती मिळवली.दरम्यानच्या काळात नवनियुक्त एसपी निलेश तांबे यांनी पदभार सांभाळून काही प्रशासकीय बदल्या देखील केल्या.गुरुवारी रात्री दोन वाजेपर्यंत कामकाज केलेल्या तांबे यांना सकाळी मात्र धक्का बसला.कारण त्याकडून स्थगिती मिळवलेले विश्व पानसरे यांनी शुक्रवारी सकाळी साडेसात वाजताच कार्यालयातील खुर्चीवर ताबा मिळवला होता.त्यामुळे निलेश तांबे यांच्यासमोर खुर्चीचा प्रश्न निर्माण झाला. त्यांनी अप्पर पोलीस अधीक्षकांच्या दालनामध्ये कामकाजाला सुरुवात केली. दरम्यान एक खुर्ची आणि दोन एसपी असा पेचप्रसंग यावेळी उद्भवल्याने पोलीस दलात खळबळ उडाली.हे नाट्य सुरू असतानाच अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांची एसपी कार्यालयात एन्ट्री झाल्याने आता तरी या नाट्यांवर पडदा पडेल असे वाटत होते.विशेष पोलीस महानिरीक्षक पोकळे यांनी दुपारी एक वाजता च्या दरम्यान विश्व पानसरे यांच्याशी काही वेळ चर्चा केली तर तांबे यांच्या सोबतही बंद द्वार संवाद साधला.
पत्रकारांनी यावेळी माहिती विचारली असता, हा पोलिसांचा अंतर्गत विषय असल्याचे सांगून महानरीक्षक पोकळे यांनी काढता पाय घेतला.एसपी ऑफिस मध्ये मात्र निलेश तांबे खुर्चीवर बसून होते तर विश्व पानसरे घरी परतले होते. त्यामुळे 9 जूनला पानसरे यांच्या बदलीच्या सुनावणीनंतर बुलढाणा जिल्ह्याचा एसपी कोण? हे स्पष्ट होणार आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!