जळगाव जामोद (हॅलो बुलडाणा) येथे महावितरणच्या वायरमन प्रमोद गाडकर यांच्या निष्काळजीपणामुळे संपूर्ण गावाला १२ तास अंधारात काढावे लागले. सकाळी १० वाजता भावगिर महाराज ट्रान्सफॉर्मर अचानक बंद पडला. मात्र, गाडकर यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता अनुपस्थिती पत्करली आणि ग्रामस्थांच्या फोनवर “हे माझं काम नाही” म्हणत थेट फोन कट केला.गावकऱ्यांच्या संतापाला उधाण आले असून, त्यांनी थेट जळगाव कार्यालयाशी संपर्क साधत रात्री १० वाजता तांत्रिक टीमला बोलावले. चौकशीत ट्रान्सफॉर्मर जळालेला नसून तो फक्त ट्रिप झाल्याचे स्पष्ट झाले. अवघ्या १० मिनिटांत वीजपुरवठा सुरळीत झाला.
हा प्रकार म्हणजे स्पष्ट हलगर्जीपणाचे आणि गैरजबाबदारीचे ज्वलंत उदाहरण आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या ढिसाळ वर्तणुकीमुळे संपूर्ण गाव त्रस्त झाले. संतप्त ग्रामस्थांनी दोषी वायरमनवर कठोर कारवाईची मागणी करत अधिकृत तक्रार दाखल केली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले असून, कारवाईचे आश्वासन दिले आहे.










