बुलडाणा (हॅलो बुलडाणा) रुईखेड टेकाळे ग्रामपंचायतीने १५व्या वित्त आयोगातून खरेदी केलेल्या साहित्याचा वापर न करता केवळ बिले सादर करून कोट्यवधींचा गैरव्यवहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पंचायत समितीच्या अहवालानुसार गावातील अंगणवाड्यांना साहित्य मिळाले नसल्याची माहिती सेविकांनी दिली, तर सार्वजनिक कचराकुंड्या व सीलर लॅम्प प्रत्यक्षात कुठेच आढळल्या नाहीत.
साठा रजिस्टर भरलेले नसल्याने साहित्य खरेदीची खातरजमा होऊ शकली नाही. भूमिगत गटार निकृष्ट दर्जाचे, नालीच्या ढाप्यांची तूट आणि शाळेजवळ केलेल्या कचरा शेडमुळे मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. पाणी पुरवठ्याचे साहित्य खरेदी करून देखील त्या कामाचे प्रमाणपत्र उपलब्ध नसल्याने निधीच्या वापराबाबत मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.या सगळ्या गंभीर अनियमिततेबाबत संबंधित सरपंच आणि सचिव यांच्यावर कार्यवाहीची शिफारस करण्यात आली आहे. गावकऱ्यांच्या आरोग्याशी आणि निधीच्या चुकीच्या वापराशी संबंधित हे प्रकरण अत्यंत गंभीर असून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. पंचायत समितीच्या तपासणीत हा प्रकार समोर आला असून, यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.










