बुलढाणा (हॅलो बुलडाणा) जिल्ह्यात सोमवार दि. ३१ मार्च २०२५ रोजी किंवा चंद्र दर्शनानुसार एक दिवस पुढे-मागे रमजान ईदचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणार आहे. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी आणि सार्वजनिक शांततेस बाधा येऊ नये, यासाठी दारूबंदी कायदा १९४९ च्या कलम १४२ अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा वापर करून ३१ मार्च “कोरडा दिवस” म्हणून जाहीर केला आहे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी निर्गमित केले आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील सर्व देशी-विदेशी दारू दुकाने, परवानाकक्ष, तसेच बिअर बार संपूर्ण दिवस बंद राहणार आहेत. सर्व अनुज्ञप्तीधारकांनी हे आदेश पाळावेत. आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.