बुलढाणा (हॅलो बुलडाणा/इमरान खान) जिल्ह्यातील देऊळघाट येथे गेल्या काही महिन्यांपासून सर्रास अवैधरित्या देशी आणि विदेशी दारू विक्री सुरू आहे. ही अवैध दारू विक्री पोलिसांच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे बंद होत नसल्याने एकाने उपोषण सुरू केले आहे.
देऊळघाट येथील मुख्य मार्गावरील मंदिरा जवळच दारू विक्री होत असतांना प्रशासन मूग गिळून गप्प आहे.या अवैध दारू विक्रीच्या विरोधात ठोस कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप असून संबंधित विभागांना अनेक वेळा निवेदन देऊनही गावात दारूचा महापूर वाहत आहे. निवेदने देऊन देखील संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने देऊळघाट येथील सामाजिक कार्यकर्ते रिजवान खान उस्मान खान यांनी 26 मे रोजी दुपारी 12 वाजेपासून बुलढाणा येथील टिळक नाट्य क्रीडा मंदिराच्या मैदानात उपोषण सुरू केले आहे.याप्रकरणी नवनियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे कडक कार्यवाही करतील,आणि पुन्हा येथील अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी कुणावर उपोषणाची वेळ येणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.