बुलढाणा (हॅलो बुलडाणा) गुन्हेगारांचे मनोबल वाढले असून, शहरातील कारंजा चौकाजवळील शिव शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास धक्कादायक घटना घडली. माजी नगराध्यक्ष गोकुल शर्मा यांच्या अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या संजय कुलकर्णी यांच्या घरासमोर असलेला व्यापारी हॉल फोडण्याचा अज्ञात गुन्हेगाराने प्रयत्न केला. त्यामुळे या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान झुंजार लेखणीतून निर्भिड पत्रकारीता करणाऱ्या जितेंद्र कायस्थ यांचे घर तिथेच असल्याने सदर गुन्हेगार त्यांच्यावर हल्ला करायला तर आला नव्हता ना? असा संशय बळावला आहे.
सदर घटनेत संजय कुलकर्णी यांचे चिरंजीव चिन्मय यांनी या चोराला पकडण्याचा धाडसी प्रयत्न केला, मात्र चोराने त्यांच्यावर हल्ला करून पळ काढला. स्थानिक नागरिकांनीही चोराला पकडण्याचे प्रयत्न केले असता तो फरार झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचले असून, सीसीटीव्ही फुटेजचे निरीक्षण सुरू आहे. पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरु केला असून लवकरच आरोपी पकडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. पोलिसांनी हा दरोडा होता की विशिष्ट व्यक्तींवर केलेला हल्ला याचा सखोल तपास सुरू ठेवला आहे. या घटनेमुळे बुलढाणा शहरातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पत्रकार जितेंद्र कायस्थ यांच्यावर लक्ष ठेवण्यात येत असून, त्यांना होत असलेला धोका तपासाचा भाग आहे. यापूर्वी देखील पत्रकार जितेंद्र कायस्थ यांची सुपारी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता, हे विशेष! या घटनेने शहरातील व्यापारी, नागरिक आणि पत्रकार समुदायामध्ये तणाव निर्माण केला आहे. बुलढाणा पोलिस प्रशासनाने या धाडसी हल्ल्याच्या मागील कारणांचा शोध लावून दंडात्मक कारवाई करण्याचा इरादा दर्शविला आहे.
या धक्कादायक प्रकारामुळे बुलढाणा शहरात कायदा व सुव्यवस्थेच्या संदर्भात प्रश्न उपस्थित झाले असून, स्थानिक प्रशासन आणि पोलिस अधिक सक्रिय होण्याची गरज असल्याचे सुज्ञांचे मत आहे. आगामी काळात या घटनेवरून पुढील महत्त्वाचे खुलासे होणार आहेत.बुलढाणा पोलिसांनी तपास सुरू केला असून, सर्व संबंधित घटकांवर लक्ष ठेवले आहे. या धाडसी अनुचित प्रकारामुळे शहरात सुरक्षा उपाय वाढवण्याची गरज भासत आहे.










