बुलढाणा (हॅलो बुलढाणा) ‘डासअळ्या करताहेत आरोग्याची पोखरण’ व ‘बुलढाण्याला डेंग्यूचा डंख’ ही ‘ बुलढाणा’ची बातमी प्रकाशित होताच आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. परिणामी प्राथमिक आरोग्य केंद्र रायपुर अंतर्गत रायपूर येथे आज 29 जून रोजी कीटकशास्त्रीय सर्वेक्षण करण्यात आले.
रायपूर येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गीते,जिल्हा हिवताप अधिकारी एस बी चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी बुलढाणा डॉ.एम डी सरपाते, वै. अधिकारी डॉ. शेख उस्मान प्रा आ केंद्र रायपूर, आरोग्य सहाय्यक श्री. आर एस जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आज हिवताप जनजागरण मोहिमे अंतर्गत मौजे. रायपूर येथे कीटक शास्त्रीय सर्वेक्षण करण्यात आले. पाण्याची साठवण भांडी आठवड्यातून एक दिवस स्वच्छ करून कोरडी करावी असे जनतेस आवाहन करण्यात आले. घराभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा, नाल्या गटारी वाहती करावी, जुने टायर,नारळाच्या करवंट्या भंगार साहित्य, फुलदाण्या यामध्ये पावसाचे पाणी साचू देवू नये, फ्रीज,कुलर यामधील पाणी आठवड्यातून एकदा साफ करावे. डासांची उत्पत्ती होवू नये यासाठी संडास च्या व्हेंट पाईपला जाळी बसवावी. तसेच हस्तपत्रिका वाटप करून आरोग्य शिक्षण देण्यात आले. आरोग्य सेवक , आरोग्य सेविका , आशा सेविका यांनी घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले. एकूण 18 कर्मचाऱ्यांच्या तीन टीम करण्यात आल्या होत्या. यामध्ये सुपर व्हिजन श्री. आर एस जाधव श्रीमती. विशाखा वाकोडे प्रयोगशाळाअधिरी यांनी केले.