शेगाव (हॅलो बुलडाणा) श्री गजानन महाराज संस्थान, शेगावच्या नावाने अनधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून भक्तांची फसवणूक सुरू आहे. “ऑनलाईन खोल्या बुकिंग”च्या नावाखाली काही फसवणूक करणारे टोळके सक्रिय झाले असून, श्रद्धाळूंना आर्थिक गंडा घालण्याचे प्रकार समोर येत आहेत.श्री गजानन महाराज संस्थानच्या वतीने शेगाव किंवा शाखा भक्तनिवासांमध्ये कोणतीही ऑनलाइन बुकींगची अधिकृत व्यवस्था अस्तित्वात नाही, अशी स्पष्ट माहिती संस्थानकडून देण्यात आली आहे. यामुळे अशा फसव्या वेबसाईटवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन संस्थानने केलं आहे.
हा प्रकार अत्यंत गंभीर असून, श्रद्धेचा गैरफायदा घेणाऱ्यांविरोधात तात्काळ कठोर कारवाई होण्याची गरज आहे. सायबर पोलिसांनी याची दखल घ्यावी आणि अशा फसवणूक करणाऱ्यांचा बंदोबस्त करावा, अशी जनतेतून मागणी होत आहे. भक्तांनी अधिकृत माहितीचीच खात्री करूनच पुढील पावले उचलावीत, अन्यथा आर्थिक नुकसान आणि मानसिक त्रास सहन करावा लागू शकतो.