चिखली (हॅलो बुलडाणा) बुलढाणा जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परच्या बेजबाबदारपणामुळे रस्ते अपघातांच्या मालिका सुरूच असून, आज चिखली शहरातील खामगाव चौफुली परिसरात पुन्हा एकदा जीवघेणा अपघात घडला आहे. भरधाव वेगात असलेल्या अवैध वाळू टिप्परने आंबे घेऊन जाणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली असून, या धडकेत ट्रकचालक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास चिखलीच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर घडला. घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, नियम धाब्यावर बसवून वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने आंबेवाहक ट्रकला चिरडण्याचा प्रयत्न केल्यासारखी धडक दिली.अपघातात ट्रकचा चालक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.या घटनेची माहिती मिळताच चिखली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. टिप्पर पोलिसांच्या ताब्यात असून, ट्रकला घटनास्थळावरून हलवण्यात आले आहे. मात्र, आक्रमकपणे विचारले गेले तेव्हा अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झाली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
या गंभीर अपघाताने पुन्हा एकदा प्रशासकीय झोपेचा आणि राजकीय संगनमताचा भंडाफोड केला आहे. अनेक नागरिकांनी व्यक्त केलेल्या संतप्त प्रतिक्रिया म्हणजे, अशा अपघातांमागे महसूल प्रशासनाचे मूक समर्थन, राजकीय वरदहस्त आणि लाखोंच्या आर्थिक उलाढाली आहेत. कायदेकंत्रणाला जुमानत नाहीत असे ही टिप्पर यंत्रणा बिनधास्त रस्त्यावर मोकाट फिरत आहेत.