बुलढाणा (हॅलो बुलडाणा) 22 मे जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या सूत्रांची धुरा आता नवे पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांच्या हाती देण्यात आली आहे. गृह विभागाने आजच आदेश काढत विश्व पानसरे यांची बदली करत, त्यांच्या जागी निलेश तांबे यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात पोलिस प्रशासनाच्या कामकाजात नव्या धक्कातंत्राची शक्यता निर्माण झाली आहे.गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात गुन्हेगारीला उधाण आले असतानाच पोलिस अधीक्षकपदावर ही मोठी बदली झाली आहे. पानसरे यांना रा.रा. पोलिस बल गट क्रमांक 9, अमरावती येथे समदेशक म्हणून पाठवण्यात आले आहे. त्यांच्या कार्यकाळात काही ठळक कामगिरी झाली असली तरी अनेक संवेदनशील प्रकरणांवर त्यांनी मौन बाळगल्याची टीका देखील झाली होती.
दरम्यान, नव्याने नियुक्त झालेले एसपी निलेश तांबे हे नागपूर गुन्हे अन्वेषण विभागात कार्यरत होते. त्यांचा तपास कौशल्य, गुन्हेगारांवरची पकड आणि आक्रमक कार्यशैली ही त्यांची ओळख आहे. त्यामुळेच बुलढाण्यातील गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी तांबे यांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत.