मेहकर (हॅलो बुलडाणा) एका शेतकऱ्याला चहा पिणे महागात पडले.हा चहा त्यांना 1 लाख 10 हजार रुपयांचा पडला. कारण हॉटेलवर चहा पिण्यासाठी गेले असता, त्यांच्या उभ्या दूचाकीच्या डिक्कीतून ही रक्कम अज्ञात चोरट्याने लंपास केली.ही घटना जानेफळ रोडवरील हॉटेल तोरणा ता.मेहकर जि. बुलढाणा येथे 17 मे रोजी घडली.याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी उत्तम पुंजाजी दुगाणे रा.साब्रा ता. मेहकर हे 43 वर्षीय शेतकरी एम एच 28 बीटी 3313 क्रमांकाच्या आपल्या दुचाकीने साब्रा येथून एसबीआय कृषी शाखा मेहकर येथे गेले होते. खात्यावर जमा झालेल्या 1 लाख 15 हजार रुपयां पैकी 1 लाख 10 हजार रुपये त्यांनी बँक खात्यातून काढून प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून ते निघाले होते. दरम्यान जानेफळ रोडवरील हॉटेल तोरणासमोर दुपारी अडीच वाजताच्या सुमारास त्यांच्या गावातील परमेश्वर ठाकरे यांच्याशी त्यांची भेट झाली. यावेळी त्यांनी हॉटेलवर चहा घेतला आणि परत दुचाकी जवळ आले असता त्यांनी दुचाकीची डिक्की तपासली तेव्हा डिक्कीतील रक्कम लंपास झाल्याचे दिसून आले.त्यामुळे उत्तम पुंजाजी दुगाणे यांनी मेहकर पोलीस स्टेशनला याबाबत तक्रार दिल्यावरून अज्ञात आरोपी विरुद्ध 303 (2) बिएनएस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस करीत आहेत.