लोणार (हॅलो बुलडाणा/संदीप मापारी) येथील पुरातन दैत्य सुदन मंदिरात १६ मे पासून किरणोत्सव प्रारंभ होणार असून,येथे जायत तयारी करण्यात आली आहे.लोणार शहर पुरातन मंदिरा साठी प्रसिद्ध आहे. जगप्रसिद्ध लोणार सरोवरात आणि सभोवताली खूप प्राचिन मंदिरे आढळून येतात, त्यातीलच एक आहे सुबक दगडी कोरीव कलाकुसर असलेले प्राचीन दैत्यसूदन मंदिर! तब्बल 1000 वर्ष जुने असलेले हे मंदिर शहराचा एक अनमोल ठेवा आहे, या मंदिराची कलाकुसर थेट कोनार्क च्या सूर्य मंदिराशी मिळती जुळती असलेली आढळून येते.
भगवान विष्णूंच्या दैत्य सुधन अवतारला समर्पित असलेले हे मंदिर बघण्यासाठी पर्यटकांची नियमित वर्दळ असते आणि याच मंदिरामध्ये १६ मे पासून सलग पाच दिवस किरणोत्सव अनुभवायला मिळणार आहे. पुढील पाच दिवसात दुपारी साडेअकरा ते एकच्या दरम्यान सूर्यकिरण भगवान दैत्य सुदन यांच्या मूर्तीला अभिषेक करताना दिसून येणार आहेत, हा प्राचीन इंजीनियरिंगचा चमत्कार बघण्यासाठी ,मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी भाविकांची गर्दी सुद्धा होण्याची शक्यता आहे, लोणार शहरातीलच रवी जावळे यांच्या परिवाराकडून येणाऱ्या सर्व भक्तांसाठी लाडवांचा प्रसाद तयार करण्यात आला आहे. पुढील चार ते पाच दिवस चालणारा हा किरणोत्सव याची देही बघण्यासाठी भाविक सुद्धा उत्सुक झालेली आहेत. पुरातत्त्व विभागाकडून हा किरणोत्सव बघण्यासाठी येणाऱ्या भक्तांसाठी सोयीसुविधा निर्माण करण्याची अपेक्षा सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे, मंदिर परिसरात पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करून देण्यात यावी तसेच भक्तांना उन्हापासून बचावासाठी सावलीची व्यवस्था त्या ठिकाणी करावी अशी रास्त अपेक्षा भाविक व्यक्त करीत आहेत. नक्कीच या किरणोत्सवामुळे लोणार शहरामध्ये पर्यटकांची वर्दळ वाढणार असल्याने पर्यटनाला सुद्धा आणि स्थानिक व्यावसायिकांना सुद्धा चांगली चालना मिळण्याची शक्यता आहे. आतापर्यंत प्रसिद्धीपासून दूर असलेला हा किरणोत्सव मागील दोन-तीन वर्षांपासून मात्र आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.हा किरणोत्सव अनुभवण्याची संधी उद्यापासून मिळणार असल्याने शहरातील स्थानिक नागरिक असो किंवा भाविक असो सर्वांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे.
▪️पोलिसांचा चोख बंदोबस्त राहील
या ठिकाणी येणाऱ्या सर्व भाविकांनी शांतता ठेवून स्वतः ही दर्शन घेऊन इतरांना सुद्धा दर्शनाची संधी द्यावी व शांतता ठेवावी या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.