बुलढाणा (हॅलो बुलडाणा) जिल्ह्यात महावितरणचे ४४ कोटींचे वीज बिल थकीत आहे. ग्राहकांनी वीजबिल भरून सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी केले आहे.त्यांनी मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीचा आढावा सुद्धा घेतला.
वाढत्या तापमानामूळे ग्राहकांना विजेअभावी होणाऱ्या त्रासाची महावितरणला जाणीव आहे. देखभाल दुरुस्तीची कामे वीज यंत्रणेच्या हिताची तसेच अखंडित, सुरळीत व सुरक्षित ग्राहक सेवेसाठी आहे. वीज ग्राहकांनी या काळात थोडासा संयम राखून सहकार्य करावे, तसेच मे महिन्यात देखभाल दुरूस्तीत महावितरणचे कर्मचारी व्यस्त झाल्याने याचा परिणाम वीजबिल वसुलीवर झालेला दिसून येतो, महावितरण वीज ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा करण्यास बांधिल आहे, वीज ग्राहकांनीही पुढाकार घेत वीजबिल भरून सहकार्य करावे असे आवाहन मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी केले आहे. लवकरच सुरू होणाऱ्या पावसाळ्यापूर्वीची वादळी वाऱ्याच्या पार्श्वभूमि बघता मुख्य अभियंता यांच्याकडून उपविभागनिहाय देखभाल दुरूस्तीचा कामाचा आढावा घेत असतांनाच वीज खांब आणि तारांचे मजबुतीकरण, वीजेचे खांब, तारा बदलणे किंवा झोल काढणे, जुन्या फिडर पिलरमध्ये इन्शुलेशन स्प्रे मारणे तसेच पावसाचे पाणी साचणाऱ्या परिसरातील फिडर पिलरची उंची वाढवणे, रोहित्रांचे अर्थिंग तपासणे, ऑइल फिल्टरेशन, उपकेंद्रातील ब्रेकरची दुरुस्ती, बॅटरी चार्जिंग, फ्यूज बदलणे इत्यादी सुरू असलेल्या आणि वीज पुरवठा प्रभावित करणाऱ्या कामाची प्रत्यक्ष पाहणीही त्यांच्याकडून करण्यात येत आहे.दरम्यान महावितरणची यंत्रणा सुरळीत वीज पुरवठ्यासाठी व्यस्त झाल्याचा परिणाम महावितरणच्या वीजबिल वसुलीवर झाला आहे. परिमंडळाअंतर्गत मे महिन्यात १५२ कोटी वसूल होणे अपेक्षीत आहे.परंतू मागील चौदा दिवसात केवळ ३९ कोटी रूपयेच वसूल झाले आहे. केवळ एप्रिल महिन्याच्या वीज वापराचा विचार केला तरी पुढी १७ दिवसात अकोला जिल्ह्यातून ४९ कोटी,बुलढाणा जिल्ह्यातून ४४ कोटी आणि वाशीम जिल्ह्यातून २० कोटी रूपये वीजबिलाचे वसूली होणे गरजेचे असल्याने वीजबिल वसूली मोहिम तीव्र करावी असे स्पष्ट निर्देश मुख्य अभियंता यांनी दिले आहे.