चोरपांग्रा ता. लोणार (हॅलो बुलडाणा /भागवत आटोळे) आज दुपारी दोन वाजल्यापासून सुरू झालेल्या पावसाच्या वाऱ्यासह वादळाने थैमान घातले. वातावरणात सुरू असलेल्या कडाक्याच्या विजेने चोरपांग्रा शिवारातील शेतात काम करणाऱ्या रंजना संदीप चव्हाण (वय 35)रा चोरपांग्रा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.रंजना चव्हाण या नेहमीप्रमाणे आपल्या शेतात काम करीत होत्या. सोबत त्यांची दोन चिमुकली मुलेही होती. अचानक वातावरणात बदल झाला आणि विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. या संकटाचा अंदाज येण्याआधीच सुमारे 3 वाजता त्यांच्या अंगावर वीज कोसळली.
हा आघात इतका भीषण होता की, रंजनाताई जागीच कोसळल्या. बाजूलाच उभ्या असलेल्या त्यांच्या दोन चिमुकल्यांनी हा भयंकर प्रसंग आपल्या डोळ्यांनी पाहिला. आईला या अवस्थेत पाहून त्यांचा थरकाप उडाला. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी धाव घेतली, मात्र तोपर्यंत रंजना चव्हाण यांचा मृत्यू झाला होता.या घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली असून, विजेच्या असुरक्षिततेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासनाने याप्रकारच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आता प्रकर्षाने जाणवू लागली आहे.