चिखली (हॅलो बुलडाणा) शिवसेना शिंदे गटप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे १२ मे रोजी तालुक्यातील इसरूळ येथे येत असून,संत चोखोबा रायांच्या पुण्यतिथी सोहळ्यास त्यांची उपस्थिती लाभणार आहे. यावेळी त्यांच्या हस्ते महाआरती करण्यात येणार आहे.दरम्यान धार्मिकता जपत उपमुख्यमंत्री शिंदे काय राजकीय भाष्य करतील? याकडेही सर्वांचे लक्ष लागून आहे.
इसरूळ येथे १० मे पासून संत चोखोबाराय यांचा पुण्यतिथी सोहळा हभप पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या नेतृत्वात पार पडत आहे. अयोध्यातील प्रभू श्रीराम मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष पू. स्वामी गोविंदगिरी महाराज यांचे या निमित्ताने सुश्राव्य शिवचरित्र कथा पारायण होत आहे.तसेच दररोज नामवंत कीर्तनकार आपली कीर्तन सेवा देत असून पंचक्रोशीतील भाविकांची मोठी उपस्थिती लाभत आहे. १८ मे रोजी या पुण्यतिथी सोहळ्याचा समारोप होणार आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उद्या इसरुळ येथे आगमन होणार असून, ते संत चोखोबा रायांची महाआरती करतील.यावेळी केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव,आमदार संजय गायकवाड उपस्थित राहणार आहेत.यावेळी ना. शिंदे जन समुदायाला संबोधित करण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जवळ आलेल्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ते काही भाष्य करतील का? चिखली तालुक्यातील शिवसैनिकांना बुस्टर देतील का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.