बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शहरातील सर्क्युलर रोडवर असलेल्या मोतीलाल ओसवाल फायनान्सच्या ऑफिसला आज भीषण आग लागली. आगीची तीव्रता इतकी भयानक होती की काही क्षणातच संपूर्ण ऑफिस जळून खाक झाले. लाखोंचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.घटनेची माहिती मिळताच बुलढाणा नगर परिषदेचे अग्निशामक दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी गणेश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्तीचे प्रयत्न सुरू केले. स्थानिक नागरिकांनीही मोठ्या धाडसाने मदतीचा हात पुढे केला. मृत्युंजय गायकवाड, दीपक तुपकर, सागर घट्टे, संदीप शेवाळे,बाळासाहेब धूड यांच्यासह स्थानिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात यश आले.
दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पोलिस आणि अग्निशमन विभागाने तपास सुरू केला आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे.