जळगाव जामोद (हॅलो बुलडाणा) तालुक्यातील माऊली फाटा येथे आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास भीषण अपघात घडला. पळशी सुपो येथून शेगावकडे जाणाऱ्या प्रकाश महादेव खेडकर आणि साधना प्रकाश खेडकर हे पती-पत्नी आपल्या दोन नातवंडांसह मोटरसायकलने प्रवास करत होते. भेंडवळजवळील माऊली फाट्याजवळ मागून भरधाव येणाऱ्या टिप्परने त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली.या भीषण अपघातात दोन्ही नातवंड—पार्थ चोपडे (वय 6, रा. राजापेठ, अमरावती) आणि युवराज मोहन भागवत (वय 5, रा. बडनेरा) यांचा जागीच मृत्यू झाला, तर आजी-आजोबा गंभीर जखमी झाले आहेत. या हृदयद्रावक घटनेनंतर संतप्त जमावाने घटनास्थळी धाव घेत टिप्परला आग लावली. आगीचे लोळ आणि धुराचे लोट यामुळे परिसरात एकच खळबळ माजली.
अपघाताची माहिती मिळताच जळगाव जामोद पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्यासोबत खामगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनीही पाहणी केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. हा अपघात नेमका कोणत्या कारणाने झाला, टिप्पर चालकाचा निष्काळजीपणा होता का, याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, संतप्त जमावाने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.