शेगाव (हॅलो बुलडाणा) शेगाव, नांदुरा आणि खामगाव तालुक्यात नागरिक आरोग्याच्या गंभीर संकटात सापडले असून, गेल्या पाच महिन्यांपासून ही समस्या अधिक तीव्र होत चालली आहे. डिसेंबरपासून सुरू झालेल्या अचानक केस गळतीच्या प्रकरणाने हजारो नागरिक त्रस्त झाले. अनेकांना टक्कल पडलं. त्यानंतर फेब्रुवारी-मार्च महिन्यात या रुग्णांच्या नखांमध्ये विद्रूपता दिसू लागली आणि नखं गळण्याचं प्रमाणही वाढलं.या साऱ्या लक्षणांमागे शरीरातील सेलेनियम चे वाढलेले प्रमाण असल्याचे नमुने तपासणीत स्पष्ट झाले होते. मात्र आता याच रुग्णांना प्रचंड थकवा आणि चिडचिडेपणा जाणवू लागला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नव्याने भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे आयसीएमआरसारख्या केंद्रीय संशोधन संस्थेने नमुने गोळा करूनही चार महिने उलटले तरी अद्याप कोणताही अहवाल दिला गेलेला नाही.
संपूर्ण परिसरातील नागरिक सतत बदलणाऱ्या, पण गंभीर होणाऱ्या लक्षणांनी त्रस्त आहेत. मात्र स्थानिक प्रशासन आणि केंद्र सरकारच्या पथकांनी केवळ दौरे करून मोकळं झाल्याचा नागरिकांचा आरोप आहे. उपचार, प्रतिबंध किंवा मार्गदर्शन काहीच मिळालेलं नाही. “आम्हाला वाऱ्यावर सोडलंय,” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक देत असून, प्रशासनाच्या ढिसाळपणावर रोष व्यक्त करत आहेत.










