सैलानी (हॅलो बुलडाणा/सचिन जयस्वाल) बुलढाणा तालुक्यातील श्रद्धास्थान असलेल्या सैलानी बाबाच्या यात्रेत काल दुपारी तीन वाजता मानाच्या होळीला विधिवत पूजा करून पेटवण्यात आले. भारतभरातून आलेल्या लाखो भाविकांनी या ऐतिहासिक होळीचे दर्शन घेतले.सैलानी बाबा होळीला मुजावर शेख रफिक मुजावर व यात्रा प्रमुख ठाणेदार दुर्गेश राजपूत यांच्या हस्ते पूजा व नैवद्य दाखवण्यात आले. भाविकांनी मोठ्या श्रद्धेने नारळाला गोटे-निंबू खेळून ओवाळले आणि होळीमध्ये फेकले. जुन्या परंपरेनुसार काहींनी जुने कपडे, तर काहींनी मनोरुग्णांवरून कोंबडे ओवाळून होळीत समर्पित केले.
सैलानी बाबाच्या समाधीवर बोकड, कोंबडे नवस घालून चादर अर्पण करण्याची परंपराही यंदा कायम राहिली. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत भाविकांची संख्या काहीशी कमी असल्याचे चित्र दिसून आले.
यात्रेच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. एसडीओ शरद पाटील, तहसीलदार विठ्ठल कुमरे, गटविकास अधिकारी एल.पी. सुरडकर, पोलीस स्टेशन रायपूरचे सर्व कर्मचारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक सतर्क होते.मुजावर कुटुंबीयांसह स्थानिक प्रशासनाच्या उपस्थितीत पार पडलेली ही यात्रा श्रद्धा आणि परंपरेचा अनोखा संगम ठरली!