देऊळगावराजा (हॅलो बुलडाणा) जिल्ह्यात पुन्हा एकदा शासनाच्या नाकर्तेपणामुळे एका शेतकऱ्याचा बळी गेला! सिंचनाच्या पाणीटंचाईविरोधात लढणाऱ्या देऊळगावराजा तालुक्यातील कैलास नागरे यांनी अखेर विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत स्पष्ट सांगितले – “जोपर्यंत माझ्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत माझा मृतदेह ताब्यात घेऊ नका!”
डिसेंबर महिन्यात खडकपूर्णा धरणातील पाणी शिवणी आरमाळ, अंढेरा, गुंजाळा व मेंढगाव पाझर तलावांमध्ये सोडावे, तसेच शिवणी आरमाळ लघु प्रकल्पाचे नाव बदलून श्री आनंद स्वामी महाराजांचे नाव द्यावे, या मागण्यांसाठी कैलास नागरे यांनी उपोषण केले होते. मात्र, शासनाने केवळ खोटी आश्वासने देऊन त्यांना फसवले. महिन्यांनंतरही काहीच कृती न झाल्याने हताश झालेल्या या शेतकऱ्याने आपल्या जीवनाचा अंत करण्याचा टोकाचा निर्णय घेतला! ही आत्महत्या नाही, हा शासनाचा खून आहे! 75 वर्षे स्वातंत्र्यानंतरही शेतकऱ्यांना अशा हृदयद्रावक चिठ्ठ्या लिहून आत्महत्या करावी लागत असेल, तर ही संपूर्ण व्यवस्थेची लाजीरवाणी हार आहे. कैलास नागरे यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही! सरकारने तातडीने त्यांच्या मागण्यांची दखल घ्यावी, अन्यथा हा लढा आणखी तीव्र होईल अशी प्रतिक्रिया रविकांत तुपकर यांनी दिली आहे!