डोणगाव (हॅलो बुलडाणा) गावातील सेवानीवृत्त नागरिकास लग्नाचे आमिष दाखवून दीड लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. आसाराम रायभान कोल्हे (वय ६७) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १४ एप्रिल रोजी मिना पवार या महिलेने फोनवरून आपल्या बहिणीसाठी स्थळ पाहत असल्याचे सांगितले. बायोडाटा देवाणघेवाणी करून कोल्हे यांना विश्वासात घेतले.२२ एप्रिल रोजी कोल्हे, त्यांचे भाऊ आणि नातेवाईक मेहकर येथे मुलगी आणि तिच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले. तिथे मुलगी पसंत पडल्याचे सांगून व ठरल्याप्रमाणे दीड लाख रुपये मागितले. कोल्हे यांनी रक्कम दिल्यानंतर स्टॅम्प घेऊन लग्न नोंदणीसाठी कोर्टात जाण्याचे नाटक रचले. मात्र, अचानक एक अज्ञात इसम फोर व्हीलर गाडीने येताच मिना पवार आणि तिच्या सहकाऱ्यांनी गाडीत बसून घटनास्थळावरून पलायन केले.
या प्रकारामुळे कोल्हे यांची फसवणूक झाली असून, त्यांनी तत्काळ डोणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. या फसवणुकीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.