देऊळगाव राजा (हॅलो बुलडाणा) देऊळगाव राजा, सिंदखेडराजा उपविभागात खडकपूर्णा धरणात झालेल्या जलप्रदूषणामुळे गंभीरता निर्माण झाली आहे.या धरणातील मासे व इतर जलजीवांच्या मृत्यूमुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात राज्य मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षांकडे दाखल करण्यात आलेल्या विशेष निवेदनात तात्काळ आणि ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. चंद्रकांत ज्ञानदेव खरात यांनी हे निवेदन दाखल केले आहे. खडकपूर्णा धरणातील जलप्रदूषणाचे मुख्य कारण
म्हणजे अवैध रेती उपसा रोखण्यासाठी जिलेटिनसारख्या स्फोटकांचा वापर होत आहे. या स्फोटकांमुळे पाण्यात रासायनिक द्रव्य मिसळून जैविक जीवन धोक्यात आल्याने मासे व इतर जलजीव मृत्युमुखी पडल्याने धरणाचे पाणी दूषित झाले असून, ते देऊळगाव राजा, सिंदखेडराजा व पंचक्रोशीतील गावांमध्ये नळाद्वारे पूरविल्या जाते. या पाणी पुरवठ्यामुळे मानवी आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
संबंधित प्रशासनाने यासंबंधी कोणतीही ठोस कारवाई न केल्यामुळे राज्य शासनाच्या परिपत्रकांची पायमल्ली झाली आहे.या गंभीर प्रकरणात मानवाधिकार आयोगाने व संबंधित विभागाने तात्काळ कार्यवाही करावी, व महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ अंतर्गत दोषी अधिकाऱ्यां विरोधात शिस्तभंगाची कार्यवाही करावी, असे निर्देश राज्य शासनाला दिले जावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.










