मुंबई/बुलढाणा (हॅलो बुलडाणा) विदर्भातील सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ व योगतज्ज्ञ डॉ. पुनम जुंबड-सोळंकी यांची ११ व्या आंतरराष्ट्रीय योग दिन (२०२५) च्या केंद्रीय समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत या आंतरमंत्रालयीन समितीत देशभरातील योग तज्ज्ञ, केंद्रीय सचिव व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश असून, डॉ. सोळंकी यांची ही नियुक्ती बुलढाणा जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे.योग प्रसारासाठी कार्यरत असलेल्या डॉ. सोळंकी यांनी गेल्या दोन दशकांपासून महिलांसाठी विशेषतः गर्भसंस्कार व मानसिक पुनर्वसन क्षेत्रात योगाद्वारे मार्गदर्शन केले आहे. त्यांनी तुरुंगातील महिला, पुनर्वसन केंद्रे तसेच सिनेसृष्टीतील कलाकारांसाठीही विशेष योग प्रशिक्षण घेतले
मुंबईस्थित ‘अॅपल डायग्नोसिस’ या प्रसिद्ध IVF संस्थेच्या त्या संचालिका असून, योग, स्त्रीआरोग्य व आहार यामध्ये त्यांचे विशिष्ट योगदान आहे. बुलढाणा युवक बिरादरी व स्पार्कल स्टार संस्थेच्या माध्यमातून त्यांनी राज्यभर सामाजिक व आरोग्य उपक्रम राबविले आहेत.चित्रकलेतही त्यांचे योगदान लक्षणीय असून, अनेक चित्रप्रदर्शनांतून त्यांनी स्वतःची वेगळी छाप निर्माण केली आहे. आयुर्वेद, अॅलोपॅथी, योग व आहारशास्त्र यांचा समन्वय साधत त्यांनी आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा आदर्श निर्माण केला आहे.