मलकापूर (हॅलो बुलडाणा) जिल्ह्यात बेकायदेशीर दारू विक्री धडाक्याने सुरू असून, अधिकृत दारू विक्रेत्यांचे आर्थिक कंबरडे मोडण्याचे हे षडयंत्र आहे का? असा सवाल आता उपस्थित होत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागातील काही अधिकाऱ्यांच्या हप्तेखोरीमुळे अवैध दारू विक्रीला अभय मिळत असल्याचा गंभीर आरोप अधिकृत विक्रेत्यांनी केला आहे.
११ मार्च रोजी अधिकृत दारू विक्रेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात उत्पादन शुल्क विभागाची निष्क्रियता स्पष्ट करून, त्वरित कारवाईची मागणी केली आहे. मलकापूर, नांदुरा, खामगावसह संपूर्ण जिल्ह्यात अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू असून, ढाबे, अंडाभुर्जी गाड्या आणि ठराविक ठिकाणी खुलेआम दारू विकली जात आहे.सरकारला कोट्यवधींचा महसूल देऊन व्यवसाय करणाऱ्या अधिकृत विक्रेत्यांना ग्राहक गमवावे लागत आहेत. कारण, बेकायदा विक्रेते उत्पादन शुल्क विभागाच्या छत्रछायेखाली स्वस्तात दारू विकून बाजारपेठ बळकावत आहेत. अनेकदा तक्रारी देऊनही कारवाई होत नसल्याने अधिकृत विक्रेते संतप्त झाले आहेत.
“आमचा व्यवसाय उद्ध्वस्त करण्यासाठी हे संगनमताने चाललेले षडयंत्र आहे. लवकरच कठोर कारवाई झाली नाही तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू,” असा थेट इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.बार मालक विरसिंह राजपूत, सोनाजी खर्चे, केदार एकडे, धनराज डवले यांच्यासह अनेकांनी यावर स्वाक्षऱ्या करून संघटित लढ्यासाठी सज्ज असल्याचे स्पष्ट केले आहे. आता राज्य उत्पादन शुल्क विभाग तातडीने कारवाई करतो की, या निष्क्रियतेमागे मोठे आर्थिक हितसंबंध गुंतले आहेत, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे!