मेहकर (हॅलो बुलडाणा) मेहकर तालुक्यातील तलाठी संजाबराव इंगोले यांच्यावर लागलेला लाचखोरीचा डाग अखेर पुसल्या गेला आहे. मेहकर न्यायालयात चाललेल्या या खटल्यात दोन्ही बाजूचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने तलाठी इंगोले व खाजगी इसम गजानन मवाळ या दोघांचीही लाच लुचपत प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली आहे.
मेहकर तालुक्यातील सोनाटी येथील तत्कालीन तलाठी संजाबराव यादवराव इंगोले व खासगी इसम गजानन रामदास मवाळ यांच्यावर लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. समाधान रतनसिंग हाडे यांनी 25/08/18 रोजी बुलढाणा येथील एसीबी कार्यालयात तक्रार दिली होती. सोनाटी शिवरातील गट क्र 456 मध्ये त्यांची शेती असून त्या शेती बाबत बक्षीसपत्राचा फेरफार नोंदवून सातबारा उतारा देण्यासाठी सोनाटी येथील तत्कालीन तलाठी संजाबराव इंगोले यांनी लाचेची मागणी केली असल्याचे हाडे यांचे म्हणणे होते. ह्या तक्रारी वरुन एसीबी बुलडाणा यानी शासकीय पंचा समोर मागणीची पडताळणी केली. लोकसेवक संजाबराव इंगोले व खासगी इसम गजानन मवाळ यांनी बक्षीसपत्राचा फेरफार नोंदवून सातबारा उतारा देण्यासाठी सात हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले आणि त्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचून लोकसेवक तलाठी संजाबराव इंगोले ह्यांना सात हजार रुपयांची रक्कम स्वीकरतांना रंगे हाथ पकडले हॊते.
तपासाअंती त्या दोघांवर लाच लुचपत प्रतिबंधात्मक कायद्याचे कलम 7,7(अ ) अन्वये दोषारोप पत्र विशेष न्यायलय मेहकर येथे दाखल करण्यात आले. मेहकर येथील विशेष न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री. सागर मुंगिलवार यांच्या कोर्टात हा खटला चालविण्यात आला. सदर खटल्यात सरकारच्या वतीने फिर्यादी समाधान हाडे, पंच क्रमांक एक आणि मंजुरात प्रदान करणारे सक्षम अधिकारी व एसीबीचे तपास अधिकारी यांची साक्ष नोंदविण्यात आली. उभय पक्षांचा युक्तिवाद ऐकून मेहकर येथील विशेष न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश यानी ५ मार्च रोजी या प्रकरणाचा निकाल दिला. सरकार पक्ष लाचेची मागणी सिद्ध करू शकले नाही असे नमूद करीत तसेच मंजूरी आदेश प्रदान करणारे अधिकारी सक्षम नसल्याचे नोंदवून तलाठी पंजाबराव इंगोले आणि खासगी गजानन मवाळ या दोघांचीही खटल्यातून निर्दोष मुक्तता केली आहे. याप्रकरणी आरोपी तलाठी व खाजगी इसमाच्या बाजूने एडव्होकेट शर्वरी सावजी तुपकर यांनी काम पाहिले. या निकालात मा. न्यायाधीशांनी आरोपींच्या वकिलांनी सरकारी साक्षीदारांचा घेतलेला उलट तपास व वरिष्ठ न्ययालयांचे न्यायनिवाड्यांचा उहापॊह केला आहे. एडव्होकेट शर्वरी सावजी तुपकर यांनी प्रभावीपणे आरोपींची बाजू मांडली तसेच प्रभावी युक्तिवाद करून आपल्या पक्षीकरांना न्याय मिळवून दिला आहे.