बुलढाणा (हॅलो बुलडाणा) मुलुख मैदानी तोफ पुण्यात आज धडाडली.. ही तोफ रविकांत तुपकर यांची होती.त्यांनी राज्य सरकारला इशारा देत 18 मार्चपर्यंत शेतकरी कर्जमाफीची घोषणा करा अन्यथा 19 मार्च रोजी मुंबई येथे आंदोलनाचा बॉम्ब टाकू असा खणखणीत इशारा दिलाय.
शेतकऱ्यांच्या मागणीची दखल न घेतल्यास सरकार कितीही बलाढ्य बहुमताचे असले तरी त्यांना गुडघे टेकायला लावू असा इशाराही तुपकर यांनी दिला आहे. यावेळी राज्यभरातील शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाशवी बहुमत मिळाल्याने मदमस्त बनलेले सत्ताधारी दारून पराभवाच्या धक्क्याने खंगून गेलेले विरोधक राज्याची अवस्था आहे. शेतकरी संघटनांची चळवळ शिथिल झालेली आहे. या साऱ्या परिस्थितीत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा आश्वासक चेहरा असलेल्या रविकांत तुपकर यांनी क्रांतिकारी शेतकरी संघटनेची स्थापना केली आहे. शेतकरी चळवळीतील आक्रमक तेवढाच विश्वासू चेहरा अशी तुपकर यांची ओळख असल्याने त्यांच्या एका हाकेवर क्रांतिकारी संघटनेच्या पहिल्या राज्य कार्यकारिणी बैठकीला सोमवारी (दि.03) पुणे येथे शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्यभरातून शेतकरी चळवळीतील ज्येष्ठ तसेच तरुण शेकडो शिलेदार बैठकीसाठी पुणे येथे आले होते. यावेळी संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी संघटनेची रूपरेषा, भूमिका आणि आगामी काळातील उद्देशाबाबत माहिती दिली. शेतकऱ्यांचा आवाज म्हणून क्रांतिकारी शेतकरी संघटना काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान तुपकर यांनी सत्ताधाऱ्यांच्या एकाधिकारशाही कारभारावर तुफान हल्ला चढवला. उत्पादन खर्च एवढाही भाव नसल्याने सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी मरणाच्या दारात येऊन ठेपला आहे असे सांगत राज्यात 60 लाख मेट्रिक टन सोयाबीनचे उत्पादन झालेले असताना सरकारने केवळ 12 ते 15 लाख मॅट्रिक टन एवढ्याच सोयाबीनची खरेदी केली आहे. ती खरेदी करताना उत्पादन खर्च एवढाही भाव दिला नाही. कापूस पिकाची हीच अवस्था आहे. कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पाणी असून दुधाला दर नाही. सत्तेवर आलेल्या राज्यकर्त्यांनी निवडणुकीपूर्वी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. सत्तेवर येताच त्यांना दिलेल्या आश्वासनाचा विसर पडला आहे. एवढा विसराळूपणा सत्ताधाऱ्यांना परवडणार नाही, असा इशारा दिला.