बुलढाणा (हॅलो बुलडाणा) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार गट) विदर्भ प्रभारीपदी माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या अनुभवाच्या बळावर पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.डॉ. शिंगणे हे विदर्भातील अत्यंत तगडे नेते असून, त्यांनी अनेक वर्षे पक्षाच्या हितासाठी झटून काम केले आहे. त्यांचा राजकीय अनुभव, कुशल नेतृत्व आणि संघटन कौशल्य पाहता ही निवड पक्षासाठी निर्णायक ठरणार आहे. आगामी काळात विदर्भात पक्षाचे जाळे अधिक बळकट करून कार्यकर्त्यांना नवसंजीवनी देण्याचे त्यांचे लक्ष्य असेल.
पक्षाच्या नेतृत्वाने घेतलेल्या या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून, विदर्भात राष्ट्रवादीचा झेंडा अधिक बुलंद होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. शिंगणे यांच्या नेतृत्वाखाली विदर्भातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून, पक्षसंघटनेला नवसंजीवनी मिळणार आहे.