बुलढाणा (हॅलो बुलढाणा) अनेक जण दारूच्या व्यसनाच्या आहारी गेले आहेत. या दारूचे व्यसन सुटावे म्हणून लोक काही ना काही उपचार करतात. परंतु काही ढोंगी बाबांनी उपचाराच्या नावाखाली आपला गोरखधंदा सुरू ठेवला आहे.बुलडाणा तालुक्यातील घाटनांद्रा गावाजवळील एका आश्रमात चपटा – बुक्क्यांचा मार देऊन दारू सोडविण्याचा उपचार केल्या जात असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे. ही चिड आणणारी घटना असून ‘ढोंगी बाबा तेथेच दाबा’ असा सूर सर्वसामान्यांमधून उमटत आहे.
घाटनांद्रा गावाजवळ धारेश्वर संस्थान म्हणून आश्रम आहे.या ठिकाणी ते दारू सोडवण्यासाठी उपचार करतात.बाबांकडे आलेल्या एका व्यक्तीला उपाचाराच्या नावाखाली त्यांनी बेदम मारहाण केल्याचा एक व्हीडिओ आज 27 जूनला दुपारी समोर आला आहे.ज्या व्यक्तीला मारहाण झाली आहे त्यांनी जर तक्रार केली तर महाराजा विरोधात कारवाई करू,अशी माहिती रायपूरचे ठाणेदार दुर्गेश राजपूत यांनी दिली आहे. दरम्यान बुवा बाबा यांचे स्तोम खुप माजले आहे बुवा,बाबा ,आम्मा व भक्तांची पैदाईश होत आहे. एकदा का नवीन बुवा मार्केटला आला की त्यांचे भक्त त्यांच्या दिव्यशक्तीचा प्रचार प्रसार करून त्याला एवढे डोक्यावर घेतात की विचारताच सोय नाही. डोळे झाकून दुध पिणा-या मांजरीप्रमाणे वर्तन करणा-या भक्तांनी त्या बुवा बाबाची दिव्यशक्ती व चमत्कार स्विकारले म्हणजे सर्वच लोक त्या बुवा बाबाला डोक्यावर घेतीलच असे नाही. काही बुद्धीप्रामाण्यवादी लोक त्या बाबाच्या दिव्यशक्ती व चमत्काराला आव्हान देऊन त्याला पळता भुई थोडी करून सोडतात तेव्हा त्या बाबाचा ढोंगीपणा सिध्द व्हायला वेळ लागत नाही.