बुलढाणा (हॅलो बुलडाणा) राज्यभरातील नवविवाहित आणि विवाहोच्छुक जोडप्यांसाठी मोठी बातमी! जगप्रसिद्ध लोणार सरोवर परिसरात आता प्री-वेडिंग शूटिंग करता येणार आहे. मात्र, यासाठी तब्बल ३५ हजार रुपये मोजावे लागणार आहेत. भारतीय पुरातत्त्व विभागाने यासाठी अधिकृत परवानगी दिली असून, इच्छुकांना सात दिवस आधी बुकिंग अनिवार्यअसेल.गेल्या अनेक वर्षांपासून लोणार सरोवराच्या नैसर्गिक सौंदर्यामुळे येथे शूटिंगसाठी मोठी मागणी होती. मात्र, पुरातत्त्व विभागाच्या नियमांमुळे या ऐतिहासिक स्थळावर शूटिंग करण्यास बंदी होती. त्यामुळे अनेक जोडप्यांचा हिरमोड होत होता. मात्र आता पैशाच्या मोबदल्यात परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यभरातील लोकप्रिय पर्यटनस्थळांवर प्री-वेडिंग शूटिंगसाठी मोठी मागणी असते. लोणार सरोवराच्या सौंदर्यामुळे येथे अशा शूटिंगसाठी मोठ्या प्रमाणात लोक येत होते. मात्र, परवानगी नसल्याने त्यांना परतावे लागत होते. आता सरकारी तिजोरी भरण्याच्या उद्देशाने पुरातत्त्व विभागाने ३५ हजार रुपयांचे शुल्क लावून प्री-वेडिंग शूटिंगसाठी मान्यता दिली आहे.याचा अर्थ, आता लोणार सरोवराच्या ऐतिहासिक स्थळावर प्रेमाच्या आठवणी जपण्याचे स्वप्न पूर्ण होणार असले तरी, सामान्य नागरिकांसाठी हे परवडणारे ठरणार नाही. सरकारी निर्णयामुळे निसर्गप्रेमी आणि नवविवाहितांना आर्थिक फटका बसणार आहे. प्रेमाच्या आठवणी कैद करायच्या असतील, तर आता खिशाला चांगलीच झळ बसणार आहे!