बुलढाणा (हॅलो बुलडाणा) – देवदर्शनाच्या पवित्र यात्रेला निघालेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला! गाडीला झालेल्या भीषण अपघातात 30 वर्षीय आयटी इंजिनीअरचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचे कुटुंबीय गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.सिंदखेडराजा तालुक्यातील वर्दडी बुद्रूक बेलवाडी तांड्याचा रहिवासी कैलास ताराचंद चव्हाण (30) हे पत्नी आणि सासरच्या मंडळींसह देवदर्शनासाठी जात असताना हा अपघात झाला.सातारा जिल्ह्यातील शिराळा येथील बायपासवर गोरक्षनाथ मंदिर पुलाजवळ 24 फेब्रुवारीच्या सकाळी हा भीषण अपघात घडला.
रत्नागिरी जिल्ह्यातील नानीज येथे कैलास पत्नी कांचन चव्हाण (23), सासरे भीमराव पवार (50), सासू वर्षा पवार (45) आणि चालक पवन राठोड (रा. आळंदी, मुळगाव पिंपरखेड, ता. सिंदखेड राजा) यांच्यासह जात होते. मात्र, गोरक्षनाथ मंदिर पुलाजवळ दूध वाहतूक करणाऱ्या भरधाव वाहनाने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, कैलासचा जागीच मृत्यू झाला, तर इतर गंभीर जखमी झाले.हा अपघात होताच घटनास्थळी एकच आरडाओरड सुरू झाली. स्थानिकांनी धाव घेत जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, होतकरू तरुण कैलासला वाचवता आले नाही. एका कुटुंबावर कोसळलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे.