बुलढाणा (हॅलो बुलडाणा) महायुती सरकारच्या काळात पीक विमा योजनेत प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाल्याचे आरोप विरोधकांकडून होत असतानाच राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. हल्ली भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही. पण आम्ही एक रुपयात शेतकऱ्यांना पीक विमा दिला, असे माणिकराव कोकाटे यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्याने वादंग निर्माण होण्याची चिन्हे आहेत.दरम्यान शिवसेना नेत्या जयश्रीताई शेळके यांनी या विधानाबाबत संताप व्यक्त केला आहे.’एक -एक रुपये घेणारे भिकारडे सरकार आता याच पैशांवर करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणार असल्याचा आरोप शेळके यांनी केला आहे.
“हल्ली भिकारी ही एक रुपया घेत नाही, पण आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा दिला.” असे वक्तव्य राज्याचे कृषिमंत्रीच करत असेल तर ती या राज्यासाठी मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे. कृषिमंत्र्यांनी राज्य शासनाने एक रुपया घेऊन पिक विमा दिला म्हणजे शेतकऱ्यांवर कोणतेही प्रकारचे उपकार केले नाहीत.शेतकऱ्यांकडून एक- एक रुपया घेणारे भिकारडे राज्य सरकार शेतकऱ्यांना हक्काचा पिक विमा देऊ शकले नाही ही वस्तुस्थिती आहे. शेतकऱ्यांकडून घेतलेल्या एक-एक रुपयांवर करोडो कोटींचे घोटाळे करणाऱ्या राज्य सरकारचा आणि अशा कृतघ्न आणि निर्लज्ज कृषीमंत्र्यांचा जाहीर निषेध करते,असा संताप जयश्रीताई शेळके यांनी व्यक्त केला.महायुती सरकारने एक रुपयात पीक विमा योजना सुरु केली होती. मात्र, काही लोकांनी त्याचा गैरउपयोग केला. पीक विमा योजना ही यशस्वी झाली पाहिजे, त्याचा योग्य लाभ शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. पीक विमा योजनेबाबत चांगले-वाईट अनुभव सरकारच्या पाठीशी आहेत. पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांची लुटमार करतात. सरकारला पीक विमा योजना बंद करायची नाही. पीक विमा योजनेत सुधारणा करायची आहे. पीक विम्यातील गैरप्रकार टाळण्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतील. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठकीत योग्य निर्णय होईल, असे माणिकराव कोकाटे यांनी म्हटले आहे.