बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शहरातील जिल्हा परिषद शाळेतील बारावीच्या परीक्षा केंद्रावर झालेला प्रकार पाहता शिक्षण विभागाच्या कारभाराचा पुरता भंडाफोड झाला आहे. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी केंद्राच्या आवारात दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच पडलेला आढळल्याने पालकांचा संताप अनावर झाला आहे. ही घटना केवळ परीक्षार्थींच्या भवितव्याशी खेळ करणाराच प्रकार नसून शिक्षण व्यवस्थेतील हलगर्जीपणाचे ज्वलंत उदाहरण आहे परीक्षा केंद्रावर पाण्याची आणि स्वच्छतागृहाची कोणतीही व्यवस्था नसल्याने पालकांना असह्य परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. केंद्रावर मुलांचे हाल पाहून अनेक पालक संतप्त झाले असून या प्रकारामुळे परीक्षार्थींच्या मानसिकतेवरही परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरवर्षी शिक्षण विभागाकडून परीक्षा केंद्रांसाठी लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो, पण प्रत्यक्षात मूलभूत सोयीसुविधाही उपलब्ध नसल्याचे चित्र यंदाही समोर आले आहे. यावरुन केंद्र संचालक आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांवर गंभीर कारवाई करण्याची मागणी पालकांकडून होत आहे.
दारूच्या बाटल्यांचा प्रश्न हा केवळ परीक्षा केंद्राच्या सुरक्षेचा मुद्दा नसून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही उपस्थित करतो. यामुळे या केंद्रावर परीक्षेपूर्वी कोणत्या प्रकारचे व्यवहार झाले, याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.










